नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील थकबाकीदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. कारण, १ लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजविण्याची मोहिम सुरू करण्यात आली आहे. यामुळे होणारी बदनामी टाळण्यासाठी थकबाकीदारांनी थकबाकी भरण्याला पसंती दिली आहे. त्यामुळेच मोहिमेच्या पहिल्याच दिवशी तब्बल ७४ लाखांची कर वसुली झाली आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदेशानुसार अतिरीक्त आयुक्त अर्चना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आज. दि. 17 ऑक्टोबरपासून एक लाखाच्या पुढे असलेले थकबाकीदार यांच्या घरासमोर किंवा आस्थापनांसमोर ढोल वाजवण्यच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आलेली आहे. या मोहिमेला मनपाच्या सहाही विभागात मोठी प्रतिसाद मिळाला. एकूण 73 लाख 57 हजार 856 रुपयांची वसुली झाली आहे. पूर्व विभागात सर्वाधिक 28 लाखांची वसुली झाली आहे. त्यानंतर नाशिक पश्चिम विभागात 25 लाख 50 हजारांची वसुली झाली आहे. सर्वात कमी वसुली पंचवटी विभाग 3 लाख 48 हजार 727 रुपये झाली आहे.
सहा विभागाचे विभागीय अधिकारी आणि कर विभागातील कर्मचा-यांनी मोहिमेत सहभाग घेतला. सहा विभाग मिळून एकूण 73 ठिकाणी ढोल वाजविण्यात आले. कर भरुन नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण होईपर्यंत ही मोहिम सुरुच राहणार असल्याची माहिती अतिरीक्त आयुक्त अर्चना तांबे यांनी दिली आहे.
विभागनिहाय कर वसुली खालीलप्रमाणे
नाशिक पूर्व – २८,००,००० रुपये
नाशिक पश्चिम – २५,५०,००० रुपये
पंचवटी – ३,४८,७२७ रुपये
नाशिक रोड- ५,८९,१२९ रुपये
नवीन नाशिक- ५,२०,००० रुपये
सातपूर – ५,५०,००० रुपये
ढोल वाजविण्यात आलेली मिळकत संख्या
नाशिक पश्चिम – १५
नाशिक पूर्व – २३
नविन नाशिक -९
पंचवटी – ६
नाशिक रोड – ८
सातपूर- १२
Nashik Property Tax Recovery Dhol Bajao Campaign