नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मानवतेला काळीमा फासणारा एक धक्कादायक प्रकार शहरात समोर आला आहे. सातत्याने वैद्यकीय क्षेत्र बदनाम होण्यामागे या क्षेत्रातील व्यक्तीच कारणीभूत आहेत. रुग्णसेवेऐवजी केवळ लूट हाच उद्योग सुरू असल्याने सर्वसामान्यांचा खासगी हॉस्पिटल्सवरील विश्वास उडत चालला आहे. एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृतदेह केवळ एका स्वाक्षरीसाठी तब्बल ५ ते ६ तास अडवून ठेवल्याचे समोर आले आहे. खासगी हॉस्पिटलच्या या कारभारावरुन शहरात तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
पोलिसांनीच दिलेल्या माहितीनुसार, श्रीराम रामदास वानखेडे (वय ५३, रा. हरी विठ्ठल नगर, जळगाव) हे जळगाव पोलिस दलात आहेत. सध्या ते रावेरला कार्यरत आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने तातडीने जळगावला उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, तेथून पुढील उपचारासाठी नाशिकला खासगी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचे रात्रीच्या सुमारास निधन झाले. पोलिसांसाी मेडिक्लेमची सुविधा आहे. असे असतानाही केवळ काही कागदपत्रांवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची स्वाक्षरी हवी यासाठी या हॉस्पिटल प्रशासनाने पोलिस कर्मचाऱ्याचा मृतदेह पाच ते सहा तास अडवून ठेवला. यासंदर्भात काही पोलिस अधिकाऱ्यांनीही मध्यस्थी केली. मात्र, स्वाक्षरी हवीच, असे सांगत सहकार्य करण्यास नकार दिला. अखेर याप्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाला चांगलेच धारेवर धरण्यात आल्यानंतर पहाटेच्या सुमारास मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, याप्रकाराबद्दल पोलिस दलात तीव्र असंतोषाचे वातावरण आहे. तर, पोलिस कर्मचाऱ्यांनाच खासगी हॉस्पिटल अशी वागणूक देतात तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. खासगी हॉस्पिटल्सची ही मनमानी दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारांनी कठोर पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी आता होत आहे.