नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिक्षण क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तीमत्व आणि गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो स गोसावी यांचे मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिव अंतिम दर्शनासाठी बी.वाय.के कॉलेज येथे सकाळी १० ते दुपारी ४ या दरम्यान घेता येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५:३० वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील महान व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली व्यक्त होत आहे.
डॉ. मो. स. गोसावी यांची प्राणज्योत वयाच्या ८८ व्या वर्षी मालवली. त्यांच्या पश्च्यात मुले शैलेश आणि कल्पेश आणि तर कन्या डॉ. दीप्ती देशपांडे असा परिवार आहे. जगातील सर्वात कमी वयाचे महाविद्यालय प्राचार्य अशी त्यांची ओळख आहे. शिक्षण, अध्यात्म, व्यवस्थापन अशा विविध विषयांमध्ये त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांचे कार्य आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजले आहे. महाराष्ट्रात व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम सुरू करण्याचे श्रेय त्यांच्याकडेच आहे. नाशिक आणि पालघर येथे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक संधी उपलब्ध करुन दिल्या. त्यांनी त्यांचे आय़ुष्य शिक्षण क्षेत्रासाठी वाहिले होते.
बीवायके कॉलेजच्या प्राचार्य पदाची धुरा त्यांनी सांभाळली. त्यावेळी त्यांचे वय अवघ्या २३ व्या वर्षी त्यांनी ही जबाबदारी घेतली आणि तो जागतिक विक्रम झाला. तेव्हापासून त्यांनी अनेक शैक्षणिक कार्ये केली. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार व सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या निधनामुळे मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.