नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) पक्षाचे उपनेते बबनराव घोलप यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ही बाब नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात परिणामकारक ठरणार असल्याचे बोलले जात आहे. अखेर यासंदर्भात आता घोलप यांनीच प्रतिक्रीया दिला आहे. राजीनामा का दिला, ते नाराज का आहेत याचा खुलासा त्यांनीच केला आहे.
घोलप म्हणाले की, मी कट्टर शिवसैनिक आहे. केवळ नाशिकच नाही तर अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी सर्वात पहिली शिवसेना शाखा सुरू करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न केले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसात घडलेल्या घडामोडी पाहूनच मी उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत राहीन, असे त्यांनी स्पष्ट केले.
यामुळे आहे नाराजी
घोलप यांची नाराजी खासकरुन अहमदनगर जिल्हा आणि त्यातही शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत आहे. काही दिवसांपूर्वीच माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. ही बाबच घोलप यांना खटकली आहे. वाकचौरे यांच्यामुळेच अनेक सर्वसामान्य शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी नगर जिल्ह्याचा दुष्काळी दौरा केला. या दौऱ्यात ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर हे वाघचौरे यांना पुढे पुढे करीत होते. ठाकरे यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याविषयी मला किंवा जिल्हा प्रमुखालाही काहीच कल्पना नव्हती. त्यानंतर थेट सामनामधूनच कळाले की शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा संपर्कप्रमुखपद बदलण्यात आला आहे. माझ्याऐवजी अन्य कुणाची नियुक्ती केली आहे. अशा पद्धतीने जर सर्व घडत असेल तर सहाजिकच मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कार्य करणे पसंत करेल, असे घोलप यांनी सांगितले.
उद्या मुंबईला जाणार
घोलप पुढे म्हणाले की, मी स्वतः हाताने राजीनामा लिहून तो उद्धव ठाकरे साहेबांना व्हॉटसअॅपवर पाठवला आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी मला फोन केला. ते म्हणाले की, अचानक तुम्ही राजीनामा का दिला. मुंबईत या आपण चर्चा करु. त्यानुसार, मी उद्या मुंबईला जाणार आहे. सविस्तर चर्चा करणार असल्याचे घोलप यांनी सांगितले आहे.
Nashik Politics Shivsena UBT Babanrao Gholap Resignation Reason