नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर नाशिक शहराद शरद पवार आणि अजितदादा गट आमने सामने आले आहेत. निमित्त होते ते मुंबई नाका येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्याचे. दोन्ही गट समोरासमोर आल्याने हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला. यावेळी अजितदादा गटाचे कार्यकर्त्यांनी कार्यालयाचा ताबा घेतला. तर, शरद पवार समर्थकांना बाहेर थांबावे लागले. या परिस्थितीची दखल घेत पोलिसांता तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगल नियंत्रण पथकही सज्ज करण्यात आले आहे. या घटनेची सध्या राज्यभरात चर्चा होत आहे.
राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर छगन भुजबळ हे मंत्री झाले आहेत. तर जिल्ह्यातील सर्वच राष्ट्रवादीचे आमदार हे अजित पवार यांच्या गटात दाखल झाले आहेत. त्यानंतर शरद पवार यांना मानणारा गट आता सक्रिय झाला आहे. शरद पवार गटाने बैठकीचे नियोजन केले. पण, ही बैठक होऊ शकली नाही. मात्र, हा गट बैठकीवर ठाम आहे. त्याचवेळी अजितदादा गटाचे तथा छगन भुजबळ समर्थक मुंबई नाका येथील पक्ष कार्यालयाच्या ठिकाणी आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि अजितदादा गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. शरद पवार गटाचे पदाधिकारी बैठक घेणार होते. मात्र या बैठकीसाठी राष्ट्रवादी कार्यालयात येऊ देणार नाही, असा इशारा अजितदादा-भुजबळ गटाने दिला. त्यामुळे कार्यालयाबाहेर व रस्त्यावरच घोषणाबाजी सुरु झाली. या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दंगल नियंत्रण पथक देखील राष्ट्रवादी कार्यालय बाहेर तैनात करण्यात आले.
कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले
राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले असून दोन्ही गटाकडून मोठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण होते. दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी भवन कार्यालयावर ताबा सांगितलं जात होता. सकाळी आजच्या अजित पवार गटाच्या नेत्यांनी कार्यालयाचा ताबा घेतला. त्यानंतर दुपारी शरद पवार गटाच्या नेत्यांकडून बैठक होणार होती. त्यासाठी शरद पवार गटाचे नेते जमले. पण, अगोदरच भुजबळ गटाचे समर्थक कार्यालयात उपस्थित होते. यावेळी नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार देखील उपस्थित आहेत. माजी नगरसेवक गजानन शेलार, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड हे उपस्थित आहेत. गजानन शेलार हे शरद पवार यांच्या बाजूने उभे आहेत तर आव्हाड चर्चा करून मार्ग काढा, या भूमिकेमध्ये आहे.