नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे यांची तब्येत बरी नसल्याने त्यांच्यावर नाशिक शहरातील संजीवनी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे. आज मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, संजय खैरनार, कैलास मुदलीयार, चिन्मय गाढे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी संजीवनी रुग्णालयाचे डॉ.अमेय कुलकर्णी, डॉ.मधुर केळकर कुलकर्णी यांच्याशी आमदार सरोज आहिरे यांच्यावर सुरू असलेल्या उपाचाराबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच आवश्यकता असल्यास मुंबईच्या तज्ञ डॉक्टरांशी चर्चा करून अधिक तपासण्या करून आवश्यकतेनुसार मुंबईला उपचार घ्यावा असे त्यांनी सांगितले.
अजित पवार गटात जाणार
अजित पवार यांच्या नेतृत्वात ३०हून अधिक आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केली आहे. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आणि अजित पवार यांनी स्वतंत्रपणे आमदारांची बैठक बोलावली. या दोन्ही बैठकांना सरोज अहिरे या अनुपस्थित होत्या. त्यामुळे आता त्या कोणत्या नेत्याच्या नेतृत्वात काम करणार अशी चर्चा आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार हे अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले आहेत. त्यातच मंत्री छगन भुजबळ यांनी आज अहिरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे त्या अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.