नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रस्त्यात पडलेले साडेसहा लाख रुपये पोलीसांनी अवघ्या तासाभराच्या आत शोधून तक्रारदार यांना मिळवून दिले आहेत. सरकारवाडा पोलीसांनी ही कामगिरी केली आहे. त्याबद्दल पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीए उल्हास बोरसे आणि जयेश देसले यांच्या ऑफिसमध्ये गणेशचंद्र पिंगळे हे काम करतात. ऑफिसमध्ये जमा झालेले सहा लाख ६८ हजार रुपये सीबीएस परिसरात असलेल्या जळगाव जनता सहकारी बँक येथे जमा करण्यासाठी गुरुवारी (ता. ९) दुपारी एक वाजता ते निघाले. टिळकवाडीतील महापौर निवासस्थान (रामायण) समोर सी ए तुषार पगार यांच्या ऑफिसमधून चेक घेण्यासाठी पिंगळे गेले. यावेळी त्यांनी पैसे ठेवलेल्या बॅगेत चेक ठेवला. परंतु गडबडीत पिंगळे बॅगेची चैन लावण्यास विसरले.
पगार यांच्या ऑफिसमधून दुचाकीवर ते निघाले. त्याचवेळी पाठीवरील बॅगची चैन उघडी असल्याचे रामायण बंगल्याचे समोर कळताच त्यांनी चैन लावण्यासाठी बॅग हातात घेतली. त्यावेळी त्यांना पैसे असलेली लाल पिशवी मिळून आली नाही. यामुळे त्यांनी तत्काळ परिसरात पिशवीची शोध घेतला. मात्र त्यांना पैसे पिशवी सापडली नाही. त्यांनी तातडीने घटनेची माहिती उल्हास बोरसे आणि जयेश देसले यांनी देत सरकारवाडा पोलीस ठाणे गाठत तक्रार केली.
रक्कम मोठी असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी देखील तत्काळ तक्रारीची गंभीर दखल तपासाची चक्रे फिरविली. गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे, पोलीस नाईक संतोष लोंढे, रविंद्र लिलके, योगेश वायकंडे आणि रोहन कहांडळ यांना शोध घेण्यास पाठिविले. त्यानंतर पिंगळे ज्याप्रमाणे मोटारसायकल वरून कामानिमित्त गेले. त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. पैशांची पिशवी ही तुषार पगार यांचे ऑफिसजवळ रामायण बंगल्याचे समोर पडली असल्याचे त्यांना दिसले. सदर प्लास्टिकची पिशवी एक व्यक्ती उचलत असतानाही निदर्शनास आले.
या व्यक्तिबाबत अधिक माहिती काढली असता ती अश्विनकुमार आगळे असल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी तत्काळ त्यांचा शोध घेतला आणि संपर्क साधला. त्यांच्याकडे पैशांबाबत विचारणा केली. यावेळी श्री. आगळे यांनी देखील प्रामाणिकपणा दाखवित पैसे सापडल्याचे कबूल केले. त्यांनी संपूर्ण रक्कम ही तत्काळ सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. पोलीसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे सीए उल्हास बोरसे, जयेश देसले, गणेशचंद पिंगळे यांनी पोलीस दलाचे आभार मानले आहेत.
https://twitter.com/nashikpolice/status/1535084372155826176?s=20&t=z8jVBGALcIdl7ldwaUoxoQ