नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येस केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ७६ पोलिस अधिकारी, कर्मचारी या सन्मानीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. नाशिक पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त आनंदा वाघ, आयुक्तालयातील सहायक उपनिरीक्षक वाळू लभडे, नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील सहायक उपनिरीक्षक संजय जाधव, नाशिक ग्रामीणमधील सहायक उपनिरीक्षक शामराव गडाख यांना पोलीस सेवेतील गुणवत्ता पोलीस पदक जाहीर झाले आहे. तर, गेल्या वर्षी नाशिकचे पोलीस आयुक्त व सध्या अमरावती येथील विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.
पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके जाहीर केली जातात. राज्यातील प्रवीण सांळुके, विनय कुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलिस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ आज जाहीर करण्यात आली. यासह राज्यातील 33 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर 40 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ असे राज्यातील एकूण 76 पोलिसांना पदके जाहीर कण्यात आली आहे.
‘राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक’ आणि ‘पोलीस शौर्य पदक’, जीवन आणि मालमत्ता यांचे संरक्षण, गुन्हेगारीला पायबंद आणि गुन्हेगारांना अटक करण्यासाठी उल्लेखनीय शौर्यासाठी दिले जाते. विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ पोलीस सेवेतील खास उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाते. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ संसाधन आणि कर्तव्यनिष्ठेने बजावलेल्या अमूल्य सेवेसाठी प्रदान केले जाते. वर्ष 2023 च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील एकूण 954 पोलिसांना ‘पोलीस पदके’ जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 76 पोलिसांना समावेश आहे.
मालेगाव होमगार्डचे समादेशक अधिकारी अय्युबखान अहमदखान पठाण यांना राष्ट्रपती पदक जाहिर
नाशिक जिल्हा होमगार्डस् मधील मालेगाव पथकाचे समादेशक अधिकारी अय्युबखान अहमदखान पठाण स.क्र. १५९६८, कंपनी नायक यांना १५ ऑगस्ट २०२३ स्वातंत्र्य दिनानिमित्त होमगार्ड व नागरी संरक्षण दलात विशेष व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महामहिम राष्ट्रपती पदक घोषित करण्यात आले आहे. अय्युबखान अहमदखान पठाण हे १९९२ सालापासून होमगार्ड संघटनेत कार्यरत आहेत
पठाण यांनी या संघटनेत दिलेल्या दिर्घ सेवेचे योगदान व संघटनेच्या माध्यमातून सामाजिक व राष्ट्रीय कार्ये केलेली आहेत. या विशेष व उल्लेखनीय केलेल्या कामांचे मुल्यांकन होवून त्यांना हे पदक जाहिर करण्यात आले आहे. पठाण यांना महामहिम राष्ट्रपती पदक घोषित झाल्याबद्दल महासमादेशक भुषण कुमार उपाध्याय, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य, मुंबई उपमहासामदेशक प्रभातकुमार, अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक होमगार्ड नाशिक माधुरी केदार-कांगणे, जिल्ह्यातील होमगार्डस् चे सर्व समादेशक अधिकारी, सर्व मानसेवी अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.
nashik police Officers Employee Award Declared
Independence Day