मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील गंगापूर पोलिस ठाण्याचे तत्कालिन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईणकर यांची सहपोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत एक महिन्याच्या आत चौकशी केली जाईल आणि तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. तसेच सरकारी कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याप्रकरणी असलेल्या कलम ३५३ (अ) तरतुदीचा दुरुपयोग होत असल्यास पुढील तीन महिन्यांत यामध्ये सुधारणा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
सदस्य सुहास कांदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, सरकारी कर्मचारी यांच्यावर सातत्याने होणारे हल्ले लक्षात घेऊन ही तरतूद सन २०१७ मध्ये करण्यात आली होती. त्यांनाही कामकाज करताना संरक्षण असावे आणि या तरतुदीचा गैरफायदाही घेतला जाऊ नये, ही राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे यामध्ये निश्चितपणे सुधारणा केली जाईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, नाशिक शहरातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येईल. संबंधित पोलीस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची चौकशी करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य यशोमती ठाकूर, भास्कर जाधव, आशिष जयस्वाल, देवयानी फरांदे आदींनी सहभाग घेतला.