नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक यांच्यातर्फे वर्षानुवर्षांची परंपरा असलेली नववर्ष स्वागत यात्रा व त्या अनुषंगाने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांना सर्व कायदेशीर कागदपत्रांची शनिवार (दि.५ मार्च) रोजी पूर्तता करूनही नाशिक शहर पोलीस यांच्या स्पेशल ब्रँच कडून आजपावेतो ना लिखित अथवा ना मौखिक अशी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही.
या सर्व कार्यक्रमांच्या नियोजन व आयोजनामध्ये १००० हुन अधिक कार्यकर्ते व ३००० रांगोळी व सांगीतिक कलाकार, ढोलवादक, स्वयंसेवक यांचा सहभाग असतो.
नाशिक शहर पोलिसांच्या परवानगी अभावी व संदिग्ध वातावरणामुळे, या कार्यक्रमांची आजवरची संपूर्ण तयारी वाया जाण्याची भीती निर्माण झालेली आहे. यामध्ये महावादनासाठी १००० ढोलवादक व ५०० स्वयंसेवकांनी स्वखर्चाने महावादनाची संपूर्ण तयारी केलेली आहे. तसेच अंतर्नाद या कार्यक्रमासाठी नाशिक शहरातील १००० कलाकारांनी व गुरुकुलांनी स्वखर्चाने वेशभूषा, रंगभूषा, व एकत्रित सराव यासाठी अमूल्य वेळ व पैसा खर्च केला आहे.
त्याचबरोबर महारांगोळी या कार्यक्रमासाठी शहरातील १००० माता भगिनी सहभागी झाल्या असून, त्यांनी स्वखर्चाने याचा सराव देखील केला आहे. इतकेच नाही तर संपूर्ण नाशिक शहरात गुढीपाडव्या निमित्त निघणाऱ्या एकूण २७ शोभयंत्रांमध्ये लाखो नाशिककर, संस्कृतीप्रिय व देशभक्त नागरिक या शहर पोलिसांच्या अशा वागणुकीमुळे अस्वस्थ, निराश आणि संतप्त झाले आहेत. सदर कार्यक्रमांसाठी निमंत्रित अनेक प्रतिष्ठित मान्यवर जे प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते त्यांना आता परवानगी अभावी नकार कळवावा लागणार आहे. एकंदरीत सहभागी प्रत्येकाचेच आर्थिक, शारीरिक आणि मानसिक नुकसानच या परवानगी न दिल्यामुळे झालेले आहे.
यावर्षी या सर्व कार्यक्रमांचा विषय हा “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” हा असून देखील नाशिक शहर पोलिसांनी परवानगीसाठी दप्तर दिरंगाई करणे हे अतिशय दुर्दैवी व लाजिरवाणे आहे. पोलीस आयुक्तालय, गंगापूर रोड येथे माननीय नाशिक शहर पोलीस आयुक्तांकडे नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी पूर्वनियोजित भेटीसाठी सलग ३ दिवस, अनेक अनेक तास या सर्व कार्यक्रमांची परवानगी व भेट यासाठी गेले असतांना त्यांना भेट न देता अपमानकारक वागणूक देण्यात आली. एक खिडकी योजने मार्फत परवानगीसाठी आवश्यक सर्व कार्यक्रमांची पूर्तता करून देखील शहर पोलिसांमार्फत अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून परवानगी देण्यासाठी आडकाठी केली गेली.
त्यामुळे नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक तर्फे यंदा आयोजित करण्यात आलेली स्वागत यात्रा आणि सर्व सांस्कृतिक कार्यक्रम महावादन, महारांगोळी, अंतर्नाद हे सर्व कार्यक्रम नाशिक शहर पोलिसांच्या दप्तर दिरंगाईमुळे ‘रद्द’ करण्याचा निर्णय नाईलाजास्तव व जड अंतःकरणाने घेतला आहे.
नुकतेच नाशिक शहरात ३०० वर्षांची परंपरा असलेल्या “वीर दाजीबा” मिरवणुकीला शहर पोलिसांनी ऐनवेळी परवानगी देऊन सुद्धा मिरवणुकीनंतर आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तसेच रंगपंचमीसाठी नाशिक शहराची ओळख असलेल्या पेशवेकालीन रहाड उत्सवाला अगदी वेळेवर परवानगी देण्यात आली. त्यामुळे रहाड उत्सव समितींना पूर्वनियोजन करता आले नाही.
एकंदरीत सर्वच हिंदू सणांना गेल्या काही दिवसांत पोलीस प्रशासनाच्या प्रचंड दहशत व दडपशाहीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.
नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे मागण्या
१. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या भव्यदिव्य सांस्कृतिक, पारंपरिक कार्यक्रमांना कुठल्याही अटी शर्ती शिवाय त्वरित परवानगी देण्यात यावी.
२. “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव” या विषयाकडे शहर पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष देऊन आजच दिनांक २६ मार्च रोजी शहरातील सर्व शोभयात्रांना परवानगी द्यावी.
३. श्रद्धाळू, संस्कृती प्रिय व देशभक्त नाशिककरांचा कोरोनापश्चात उत्साहावर विरजण टाकण्याचा अधिकार पोलीस प्रशासनाला नाही.
४. केंद्र सरकारमार्फत कोरोनाचे सर्व निर्बंध संपुष्टात आणले असतांना, व नाशिक जिल्ह्यात शून्य कोरोनाबाधितांची संख्या असतांना आणि शहरात लसीकरणाची टक्केवारी लक्षणीय असतांना शहर पोलिसांमार्फत मिळणारी अशा प्रकारची वागणूक म्हणजे मोगलाईच आहे.