नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराश्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा मोठा बडगा उगारला आहे. त्यामुळेच तब्बल ३५० जणांपेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, प्रमुख पदाधिकारी असलेल्या २७ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्याचे आवाहन केले. तसे न झाल्यास मशिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला आहे. नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळेच शेकडो पदाधिकाऱ्यांची सध्या धरपकड सुरू आहे. यापूर्वीच पोलिसांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना नोटिस बजावून सूचित केले होते. कायदा हातात घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता.
आज दिवसभरात पोलिसांनी ३५० पेक्षा अधिक मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. तशी माहिती पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिली आहे. शहरात अत्यंत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, प्रमुख २७ पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. या पदाधिकाऱ्यांना नाशिक शहरात १५ दिवस राहता येणार नाही. त्यांना आता नाशिक शहराबाहेर रहावे लागणार आहे. या कारवाईचे उल्लंघन झाले तर त्यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल करण्याचा इशारा, आयुक्तांनी दिला आहे.