नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोट्यावधींचा गंडा घालणाऱ्या रिलस्टार पूजा विशांत भोईर हिस कोर्टाने सोमवारी (दि.१२) न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे तिची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून तिने ही फसवणूक केली होती.
गंगापूररोडवरील अतुल सोहनलाल शर्मा (वय ६६, रा. सिरीन मिडोज, गंगापूररोड) यांनी सरकारवाडा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या भोईर यांचा ताबा आर्थिक गुन्हे शाखेने घेतला आहे.
पूजा रिलस्टार असून तिची मुलगी मराठी मालिकांमध्ये बालकलाकार असल्याने या शेअर्स घोटाळ्याला हायप्रोफाइल वलय निर्माण झाले आहे. दरम्यान भोईर यांच्या अटकेनंतर पुन्हा चार दिवसांची वाढ करण्यात आली होती. सोमवारी तिची कोठडी संपल्याने पुन्हा कोर्टात हजर केले असता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
मुंबईत सोळा लाखांचा अपहार केल्याचा गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर नाशिक पोलिसांनी तिचा ताबा घेतला होता. नाशिकच्या पथकाने ठाण्यात तळ ठोकून शेअर घोटाळा-२ चा पर्दाफाश केला आहे. पूजाच्या चौकशीत बँक खात्यांमधील लाखोंचे आर्थिक व्यवहार आढळून आले आहेत.
अल्गो ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास ७.७ टक्के मोबदला देण्याचे आमिष दाखवत पूजा विशांत भोईर (३२) आणि विशांत विश्वास भोईर (३५, रा. कल्याण, ठाणे) या दांम्पत्याने अनेकांना लाखोंना गंडविल्या चे पुढे आले आहे. पोलिसांनी भोईर यांच्या मालमत्तेसह डिमॅट खात्याची चौकशी सुरू केली असून, या खात्यात तीन कोटी रुपयांचे शेअर्स तिने खरेदी केल्याचे पुढे आले आहे. पूजाचा पती विशांत अद्याप फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.
Nashik Police Insta Reel Star Pooja Bhoir Fraud