नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात गेल्या ३ दिवसांपासून सुरु असलेल्या खुनाच्या घटनांची दखल घेत पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी आज तातडीने पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी विविध प्रकारची माहिती दिली आहे. नाईकनवरे म्हणाले की, या तिन्ही हत्यांमधील संशयितांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यातील काही संशयितांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तिन्ही खुनांच्या घटनांचा आपापसात कुठलाही संबंध नाही. किरकोळ कारणावरून आणि राग आल्याने हे खून झाल्याचे आयुक्त म्हणाले. यावेळी उपायुक्त संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्त (गुन्हे) वसंत मोरे हे उपस्थित होते.
म्हसरुळच्या खुनाचा उलगडा
दिंडोरी रस्त्यावर आकाश पेट्रोल पंपाच्या समोरील सावरकर गार्डन जवळ यश रामचंद्र गांगुर्डे हा बुधवारच्या दिवशी उभा होता. त्याच वेळी संशयित मयूर शिवचरण, सुरज उर्फ बॉबी गांगुर्डे यांच्यासह इतर काही संशयितांनी त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर यशच्या डाव्या बाजूच्या कमरेवर आणि डाव्या हाताच्या कोपऱ्याजवळ आणि पाठीवर चॉपरने संशयितांनी हल्ला केला. या घटनेत यशचा जागीच मृत्यू झाला. या हत्येनंतर पोलिसांनी तपास यंत्रणा कामाला लावली. या प्रकरणातील तिन संशयितांना अटक करण्यात आली आहे. तर यातील एक जण अद्याप फरार आहे. यशचा खून हा किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून झाल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.