नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसाचे भोंगे यावरुन राज्यभरात वादंग सुरू असताना आता नाशिक पोलिस आयुक्तांनी नवे आदेश काढले आहेत. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अन्य जणांना गंभीर इशारा देण्याच आला आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास ४ महिने ते १ वर्षाचा कारवास भोगावा लागणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा गुढीपाडवा मेळाव्यात उपस्थित केला. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी अतिशय आक्रमक धोरण स्विकारले आहे. येत्या ३ मे पर्यंत राज्यातील सर्व मशिंदींवरील भोंगे उतरवावे, असा अल्टिमेटम त्यांनी दिला आहे. जर ३ मे नंतर मशिदींवर भोंगे राहिले तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असेही राज यांनी म्हटले आहे. त्यामुळे याप्रकरणी राज्यभरातच तणावाचे वातावरण आहे. अशातच नाशिक पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी भोंग्यांसदर्भात नवे आदेश काढले आहेत.
आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे की, भोंग्यांवरुन जातीय तेढ निर्माण करु नये. मशिदीच्या १०० मीटर परिसरात हनुमान चालीसा म्हणण्यास परवानगी नाही. त्याशिवाय, कुणाला हनुमान चालीसा लावायचा असल्यास पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक असेल. नाशिकमधील सर्वच प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांना पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. ३ मे पर्यंत मशीदच नव्हे तर सर्वच धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार. ३ मे नंतर प्रार्थनास्थळावर विनापरवानगी भोंगे असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
आयुक्तांनी आदेशात पुढे म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायलयाने ध्वनीक्षेपकाबाबत दिलेल्या आदेशाचे पालन केले जाईल. औद्योगिक, निवासी, व्यावसायिक, शांतता क्षेत्रासाठी आवाजाची पातळी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार भोंगे असलेल्या प्रार्थनास्थळांना आवाजाची पातळी ठरवावी लागणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मशिदीसमोर हनुमान चालीसा पठणाचा इशारा दिला आहे. मात्र, प्रस्थापित प्रथांचा हा अधिकार नसून तो फक्त सामाजिक आणि धार्मिक तंटा निर्माण करण्याच्या हेतूने करण्यात आल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. मशिदीच्या १०० मीटर परिसरात भोंग्याद्वारे अजानच्या १५ मिनिटे आधी आणि अजान संपल्याच्या १५ मिनिटांनंतर हनुमान चालिसा, भजन, गाणे किंवा भोंगे वाजवण्यास मनाई करण्यात आली आहे. नाशिक शहरात सर्वच धार्मिक स्थळांना आता भोंग्यांसाठी पोलिस आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. लेखी अर्ज केल्यानंतर परवानगी दिली जाईल. विनापरवानगी भोंगे असलेल्या प्रार्थनास्थळांवर कारवाई केली जाईल. त्यानुसार किमान चार महिने ते एक वर्षाचा कारावास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
पोलिस आयुक्तांचे मूळ आदेश वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
भोंगे मनाई आदेश