नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जाचक हेल्मेट सक्ती, पेट्रोल पंपांवर कारवाई आणि खळबळजनक लेटरबॉम्ब यामुळे राज्यभरात चर्चेत असलेले नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांची कुठल्याही क्षणी बदली होण्याची शक्यता आहे. लेटरबॉम्बमुळे महसूल आणि आयएएस अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्याचबरोबर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही याविषयी चर्चा झाली आहे. तसेच, राज्याच्या गृहविभागाने पाण्डेय यांना कारणे दाखवा नोटिसही बजावली आहे. आयुक्त पाण्डेय यांनी स्वतःच आपल्या बदलीसाठी राज्य सरकारकडे विनंती अर्ज केला आहे. या सर्व बाबीची दखल घेत आता नाशिकला नवे पोलिस आयुक्त लाभण्याची चिन्हे आहेत.
नाशिकचे पोलिस आयुक्त पद हे आयजीपी म्हणजेच, विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाचे आहे. त्याच दर्जाच्या व्यक्तीला नाशिकमध्ये नियुक्ती दिली जाणार आहे. सद्यस्थितीत पिंपरी-चिंचवडचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांची जोरदार चर्चा आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांना ३ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे आता त्यांच्याकडे नाशिकची धुरा सोपविली जाण्याची चर्चा आहे. त्यांच्या नावाबरोबरच मुंबईचे सहआयुक्त संजय दराडे, पुण्याचे सहआयुक्त डॉ. रविंद्र शिवसे, ठाण्याचे आयुक्त दत्ता कराळे, मुंबईतील लोहमार्ग विभागाचे आयुक्त कैसर खालिद यांच्या नावाचीही चर्चा आहे. यापैकी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
तिसरा नवा अधिकारी
नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी गंगाधरन डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सूरज मांढरे यांच्याकडे राज्याच्या शिक्षण आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, म्हाडा घोटाळ्यात नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्याजागी रमेश जाधव यांच्याकडे महापालिकेची धुरा सोपविण्यात आली आहे. आता नाशिकचे पोलिस आयुक्तही बदलले जाणार आहेत. त्यामुळे नाशकात तीन नव्या अधिकाऱ्यांचा कारभार सुरू होणार आहे.