नाशिक – नाशिककरांसाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. खासकरुन जे दुचाकी वापरतात त्यांच्यासाठी. पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी एक महत्त्वाचे आदेश काढले असून त्याची अंमलबजावणी भाऊबीजेपासून (६ नोव्हेंबर) सुरू झाली आहे. त्यानुसार, दुचाकीधारकांना पेट्र्रोल पंपच नाही तर सार्वजनिक ठिकाणी हेल्मेट बंधनकारक झाले आहे. म्हणजेच, पोलिस स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालय, कोचिंग क्लास किंवा अन्य ठिकाणी जाण्यासाठी आता तुम्हाला हेल्मेट घालावेच लागेल.
हेल्मेट नसेल तर थेट वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दुचाकी चालकांच्या सुरक्षिततेसाठी आणि हेल्मेटअभावी होणाऱ्या अपघाती मृत्यू रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्तांचे हे आदेश सर्व सार्वजनिक कार्यालयांना पाठविण्यात आले आहेत. त्याची कसोशीने अंमलबजावणी सुरू झाली आहे. जे हेल्मेट वापरत नाहीत त्यांना आता त्याची सवय करुन घ्यावी लागणार आहे. तसेच, ज्यांच्याकडे नाही त्यांना ते खरेदी करणे क्रमप्राप्त आहे.
आता यांच्यावर जबाबदारी
पोलिस आयुक्त पाण्डेय यांनी सर्व सरकारी व खासगी कार्यालयांना पत्र पाठविले आहे. कार्यालयाच्या आवारात जे दुचाकी वाहनचालक येतात त्यांना हेल्मेट सक्ती आहे. याचे पालन होते आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी संबंधित कार्यालयाने इस्टेट ऑफिसरची नियुक्ती करणे आवश्यक आहे. तसेच, या अधिकाऱ्याचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक हे पोलिस आयुक्तालयाला कळविणे आवश्यक आहे. जर, एखाद्या कार्यालयाने इस्टेट अधिकाऱ्याची नियुक्ती केली नाही तर संबंधित विभागाच्या प्रमुखांवरच थेट कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.
पोलिसांचा असा राहणार वॉच
पोलिस केवळ आदेश काढून गप्प बसणार नाहीत. तर, या कार्यालयांच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज हे स्थानिक पोलिस स्टेशनचे कर्मचारी बघणार आहेत. त्यासाठी पोलिसांची या कार्यालयांमध्ये दररोज भेट असेल. ते पाहणी करतील. आदेशाची अंमलबाजवणी होत नसेल तर तसा अहवाल पोलिस आयुक्तांना सादर करतील. त्यानंतर पोलिस आयुक्त कारवाई करतील.
या कार्यालयांना लागू
शाळा, कॉलेज, विद्यापीठ, सर्व सरकारी कार्यालय, महापालिका कार्यालय, मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, निमशासकीय कार्यालये, केंद्र सरकारी कार्यालये, जिल्हा परिषद कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, कॅन्टॉन्मेंट बोर्ड, लष्करी कार्यालय,
पोलिस आयुक्तांचे आदेश असे