नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपलेल्या रंगपंचमीच्या सणासंदर्भात नाशिककरांसाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पाण्डे यांनी यासंदर्भात आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, नाशिकररांना तब्बल दोन वर्षानंतर पुन्हा एकदा रंगपंचमी खेळता येणार आहे. मात्र, डीजे किंवा अन्य वाद्यांच्या वादनावर आयुक्तांनी बंदी घातली आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने रहाडींमधील रंगपंचमी यंदा रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयुक्तांनी आजच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, केवळ पारंपरिक वाद्य वाजविण्यास परवानगी देण्यात येणार आहे. डीजे किंवा अन्य स्वरुपाचे मोठे आवाज करणारे वाद्य मात्र, वाजविता येणार नाहीत. तसेच, या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.