नाशिक – शहर परिसरातील भूमाफियांचा प्रमुख समजला जाणारा फरार आरोपी रम्मी राजपूत अखेर नाशिक पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. नाशिक पोलिसांच्या पथकाने थेट हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन राजपूतला अटक केली असून त्याला नाशिक येथे आणले जात आहे.
आनंदवली येथील एका वृद्ध भूधारकाच्या खुन प्रकरणातही राजपूत हा मुख्य संशयित आरोपी आहे. नाशिक पोलिसांनी राजपूत विरोधात मोक्काअन्वयेही कारवाई केली आहे. यापूर्वीच नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने राजपुतला फरार घोषित केले आहे. शोध घेऊनही पोलिसांना त्याचा पत्ता लागत नव्हता. मात्र, नाशिक पोलिसांनी त्याचा पिच्छा सोडला नाही. पोलिसांच्या कसून तपासाला अखेर यश आले. राजपुत हा हिमाचल प्रदेशमध्ये असल्याचा सुगावा नाशिक पोलिसांना लागला. त्यानंतर पोलिस आयुक्त दीपड पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तातडीने हिमाचल प्रदेशमध्ये रवाना करण्यात आले. तेथे सापळा रचून राजपूतला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आता त्याला नाशिक येथे आणले जात आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.