नाशिक – कोरोना संसर्गामुळे राज्य सरकारने नवरात्र काळात गरबा, दांडिया सारख्या कार्यक्रमांना मनाई केली आहे. तसेच, एका सभागृहात अधिक लोकांना जमण्यासही बंदी आहे. या सर्व बाबींचे उल्लंघन करीत थेट हॉस्पिटलच्या आवारात गरबा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर परिसरातील अशोका मेडिकोव्हर या हॉस्पिटलच्या आवारात गुरुवारी रात्री गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याची माबिती मुंबई नाका पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक कार्यक्रमस्थळी दाखल झाले. परवानगी नसताना १०० पेक्षा अधिक जणांचा गरबा कार्यक्रम सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पुरुष आणि महिला अशा दोघांचाही त्यात समावेश होता. ही बाब अतिशय गंभीर असल्याने मुंबई पोलिसांनी हॉस्पिटलचे मनुष्यबळ विकास व्यवस्थापक, म्युझिक सिस्टीम पुरविणारे आणि आयोजक अशा व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करुन आयोजकांना मोठा दणका दिला आहे.
दरम्यान, हॉस्पिटल्सचा परिसर हा सायलेन्स झोन (शांतता क्षेत्र) म्हणून घोषित केलेले असते. अशा ठिकाणी चक्क मोठ्या आवाजात गरबा आयोजित करण्यात आल्याने सर्व स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या आयोजनाचा हॉस्पिटल्समधील रुग्णांना किती त्रास झाला असेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच, शांतता क्षेत्राचा नियम मोडल्या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनावर आणखी एक गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.
बघा, डीजेवरील गरबा कार्यक्रमाचा व्हिडिओ
https://www.facebook.com/103446941470343/posts/351710356643999/