नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात लाचखोरीची कीड खोलवर रुजली असल्याचे दिसून येत आहे. आडगाव पोलिस स्टेशनचा हवालदार तब्बल २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेला. याला काही तास उलटत नाही तोच भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये लाचलुचपत विभागाने (एसीबी) यशस्वी कामगिरी केली आहे. या सापळ्यात सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पोलिस नाईक लाच घेताना पकडले गेले आहे. त्यामुळे नाशिकच्या पोलिस दलातील लाचखोरी पुन्हा चर्चेत आली आहे.
लाच देणे आणि घेणे गुन्हा असला तरी त्याची सर्रास पायमल्ली केली जाते. एसीबीच्यावतीने वारंवार सापळे रचले जात आहेत. त्यात विविध सरकारी विभागातील कर्मचारी सापडत आहेत. आडगाव पोलिस स्टेशनमध्ये २० हजाराची लाच घेताना राजेश थेटे हा हवालदार सापडला आहे. त्याची तत्काळ दखल पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी घेतली आहे. त्यांनी तडकाफडकी वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख यांची बदली केली आहे. या घटनेला काही तास उलटत नाही तोच भद्रकाली पोलिस स्टेशनमधील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रणिता पवार आणि पोलिस नाईक तुषार बैरागी हे २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडले आहेत. याप्रकरणी एसीबीचे पथक पुढील कारवाई करीत आहे.