नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच ग्रामिण पोलीसांनी गेल्या तीन दिवसात वेगवेळया पथकांनी छापे टाकत द-याखो-यातील गावठी दारूच्या हातभट्या उध्वस्त केल्या असून बेकायदा दारू आणि गुटखा वाहतूक व विक्रीस चाप लावण्यात यश आले आहे. या कारवाईत तब्बल ६४ लाख ३४ हजार २७७ रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
विधान सभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून या काळातील गैर प्रकार रोखण्यासाठी ग्रामिण पोलीसांनी कंबर कसले आहे. परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे,अधिक्षक विक्रम देशमाने,अप्पर अधिक्षक आदित्य मिरखेलकर व मालेगावचे अप्पर अधिक्षक अनिकेत भारती याच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र छापेमारी सुरू आहे. आचार संहिता लागू होताच गाव पाड्यासह वाड्या वस्त्यांमध्ये शिरून तसेच दºया खोºयातील गावठी दारूच्या हातभट्या पथकानी उध्वस्त केल्या. याबरोबरच बेकायदा मद्यविक्री व वाहतूकीवर लक्ष केंद्रीत करीत १३० केसेस दाखल करून १३१ जणांच्या मुसक्या आवळल्या या कारवाई १२ लाख १५ हजार ४०८ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
तर विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने वणी येथे सापळा लावून गुटखा वाहतूक रोखण्यात यश मिळविले. अंकलेश्वर (गुजरात) येथून मालवाहू ट्रकमध्ये शेतीच्या कॅरेट आड बेकायदेशीर रित्या गुटखा वाहतूक केला जात होता. या कारवाईत वाहनासह गुटखा असा सुमारे ४३ लाख ६५ हजार रूपये किमतीची वेगवेगळया प्रकारची सुगंधी सुपारी आणि तंबाखू हस्तगत करण्यात आली आहे. याबरोबरच मालेगाव शहरातील पवारवाडी, ओझर आणि जिह्यातील वेगवेगळया पोलीस ठाणे अंतर्गत गुटखा वाहतूकीचे सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून या कारवाई सात जणांना बेड्या ठोकत पोलीसांनी वाहनांसह गुटखा असा सुमारे ८ लाख ५३ हजार ८६९ रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असून यामुळे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.