नाशिक – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अखेर शनिवारी नाशिक पोलीसांकडे आपला ऑनलाईन जबाब नोंदविला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राणे यांच्या विरोधात शहर पोलीसांनी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याबाबत त्यांना प्रत्यक्ष हजर न राहता ऑनलाईन जबाब नोंदवण्याची मुबा देण्यात आली होती. त्यामुळे राणे यांनी हा जबाब नोंदवला. हा जबाब नोंदवतांना पोलिसांनी अनेक प्रश्न विचारले त्यावर मात्र राणे यांनीही आपल्या स्टाईलने उत्तरे दिली. नाशिक येथे शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
२४ ऑगस्ट रोजी हे आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर पहिला गुन्हा नाशिकमध्ये दाखल करण्यात आला. त्यानंतर नाशिकसह राज्यात विविध ठिकाणी राणे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या सर्व प्रकरणात उच्च न्यायालयाने राणे यांचा जामीन मंजूर करतांना १७ सप्टेंबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश राज्य सरकारला दिलेत. त्यामुळे राणे यांचा शहर पोलिसांना जबाब नोंदवता आला नव्हता. त्यानंतर शहर पोलिसांनी राणेंचा २५ सप्टेंबर रोजी ऑनलाईन जबाब घेण्याचे नियोजन आखले होते. याबाबत पोलिसांनी राणे यांच्याशी चर्चाही केली. त्यानुसार शनिवारी पोलिस उपायुक्त संजय बारकुंड यांच्यासह शहर गुन्हे शाखेच्या अधिका-यांनी राणे यांचा ऑनलाईन जबाब नोंदवला.