नाशिक : ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेल्या संचारबंदीच्या पूर्व संध्येस पोलीसांनी २०० हून अधिक जणांवर कारवाई केली. त्यात संचारबंदीचे उलंघन करणा-या १२ जणांसह विनामास्क,सोशल डिस्टन्सींग,सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे आणि तीन आस्थापनांचा समावेश आहे. या कारवाईत एक लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला असून नागरीकांनी निर्बंधाचे पालन करावे असे आवाहन पोलीसांनी केले आहे.
कोरोना या जीव घेणाºया आजाराची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या आदेशान्वये बुधवारी (दि.१४) रात्री पासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरातील तेराही पोलीस ठाणे अंतर्गंत संचारबंदीची तयारी सुरू असतांनाच अनेकांनी घराबाहेर पडत नियमांचे उलंघन केले. दिवसभरात पोलीसांनी अशा संधी साधूंना हुडकून काढत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत १५८ विनामास्क फिरणारे पोलीसांच्या हाती लागले असून त्यांच्याकडून ७९ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे उलंघन करणा-या सात जणांवर कारवाई करीत पोलीसांनी सात हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. यात सरकारवाडा हद्दीतील दोन आणि मुंबईनाका हद्दीतील एका आस्थापनेवर वेळेचे उलंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार असा तीन हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या एका थुंकीबहाद्दरास एक हजार रूपयांचा दंड़ ठोठावण्यात आला आहे. रात्री संचार बंदी लागू होताच १२ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर संचारबंदीचे उलंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. संबधीतांकडून ११ हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर ३१ जणांवर अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई यापूढेही सुरूच राहणार असून नागरीकांना कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये अन्यथा पोलीसांकडून कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीसांनी दिला आहे.