नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमेरिकेतील कोलोरॅडो येथे झालेल्या जागतिक जंप रोप अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. पहिल्यांदाच भारतीय खेळाडूंनी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये मोठ्या प्रमाणात पदके मिळवली आहेत. त्यात नाशिकच्या खेळाडूंचा मोठा वाटा आहे. या खेळाडूंचे येत्या २७ जुलै रोजी भव्य स्वागत केले जाणार आहे.
कोलोरॅडो, अमेरिका येथे १६ ते २३ जुलै दरम्यान जागतिक जंप रोप अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झाली. भारतातर्फे नाशिकच्या ४ आणि डोंबिवलीच्या ९ खेळाडूंनी प्रतिनिधित्व केले. सर्वच खेळाडू गेल्या कित्येक महिन्यांपासून दिवस-रात्र स्पर्धेची तयारी करत होते. नाशिकचे नमन गंगवाल, राजुल लुंकड, नियती छोरिया, मारवी हिरण, तन्मय कर्णिक (प्रशिक्षक) यांच्यासोबत छत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे यांना संघ प्रमुख म्हणून नेमण्यात आले होते. या सर्व खेळाडूंनी वेगवेगळ्या सामन्यात दमदार कामगिरी केली आणि पदकांची लयलूट केली.
नाशिकच्या खेळाडूंचे यश असे
१) दुहेरी अंडर जोडी मध्ये नमन गंगवाल नियती छोरीया यांना सिल्वर मेडल
२) 30 सेकंद गती रिले मध्ये एशान पुथरण, भूमिका नेमाडे, नमन गंगवाल, नियती छोरीया यांना गोल्ड मेडल
३) डबल टच स्पीड स्प्रिंट मध्ये नमन गंगवाल, नियती छोरीया, राजुल लुंकड यांना गोल्ड मेडल
या स्पर्धेत २५ देशातील १२०० खेळाडूंनी भाग घेतला होता. उज्ज्वल यश मिळविणाऱ्या नाशिकच्या खेळाडूंचे २७ जुलै रोजी नाशिकमध्ये आहमन होणार आहे. त्यानिमित्त त्यांची मिरवणूक मुंबई नाका ते कलिका माता मंदिर येथे सकाळी ८ वाजता काढण्यात येणार आहे.