योगेश सगर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
राज्यात एकूण ३०६ बाजार समित्या आहेत. यातील नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत ही बाजार समिती उत्पन्नामध्ये राज्यात तिसरी तर उत्तर महाराष्ट्रात पहिली ठरली आहे. निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांना पत्र पाठवीत, राज्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांची सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात मिळालेल्या उत्पन्नाबाबतची माहिती मागितली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य पणन मंडळाने एकूण ३०६ बाजार समित्यांपैकी २९५ बाजार समित्यांची उत्पन्नाची माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्याकून हे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील एकूण २९५ बाजार समित्यांच्या आर्थिक उत्पन्नात राज्यातील प्रादेशिक बाजार समितीत रु.१०१,५८,२०,८२७ उत्पन्न मिळवीत मुंबई एक नंबरवर, रु.७६,१०,३२,९४३ उत्पन्न मिळवीत पुणे दोन नंबरवर तर रु.३०,३०,१४,७०४ उत्पन्न मिळवीत नागपूर तीन नंबरवर वरचढ ठरल्या आहेत. तर मर्यादित कार्यक्षेत्र असलेल्या बाजार समित्यांमध्ये रु.२५,२०,४१,७१७ उत्पन्न मिळवीत सोलापूर एक नंबर, रु.२४,२०,८४,२९६ उत्पन्न मिळवीत लातूर दोन नंबर तर रु.२१,९६,८७,२४८ उत्पन्न मिळवीत पिंपळगाव बसवंत ३ नंबरवर आहेत. त्यानंतर रु.१९,३५,३७,४९४ उत्पन्न मिळवीत लासलगाव चार नंबर व रु.१७,८१,९५,३४४ उत्पन्न मिळवीत अमरावती पाच नंबरवर आहेत.
पिंपळगाव बसवंत कृषि उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र निफाड तालुक्यातील ६९ गावांचे असून २७ वर्षापूर्वी दि.२८ डिसेंबर १९९५ रोजी स्थापन झालेल्या व आमदार दिलीपराव बनकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बाजार समितीच्या माध्यमातून दिलेल्या विविध सोई-सुविधा, रोख व्यवहार, शेतकरी हिताला प्राधान्य दिल्याने अल्पवधीतच या बाजार समितीने राज्यात व देशात नावलौकिक मिळविला आहे.
पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे मालकीची १५७ एकर जमीन आहे. आर्थिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये एकूण ६५,८२,५७४ क्विंटल कांदा आवक झाली असून १,७१,६०,४५० क्रेट्स टोमॅटो आवक झाली आहे. याव्यतिरिक्त धान्य, भाजीपाला, बेदाणा, डाळिंब यांची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे. माहे एप्रिल २०२२ पासून ४९,७३,३४३ क्विंटल कांदा आवक झालेली असून १,५८,५२,०१० क्रेट्स टोमॅटो आवक झालेली आहे.
आमदार दिलीपराव बनकर यांनी दि.१८.३.२००० रोजी बाजार समितीची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी सहकाऱ्यासह शेतकरी हिताचे निर्णय घेत आर्थिक नियोजन, स्वच्छ व्यवस्थापन, खर्चात काटकसर व नियमित पारदर्शकपणे कामकाज करीत बाजार समिती शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे. बाजार समितीने मिळालेल्या उत्पन्नातून खर्चात काटकसर करीत आज पर्यंत सर्व विविध विकासकामे, सामाजिक दायित्व जपत रु.४२ कोटींच्या ठेवी शिल्लक आहेत तर बाजार समितीवर एक रुपयाचेही कर्ज नसल्याची माहिती आमदार दिलीपराव बनकर यांनी दिली आहे.
Nashik Pimpalgaon Basawant APMC Revenue
Agriculture Marketing Committee