पेठे विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष लेख

आज १५ जानेवारी, नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित आपल्या पेठे विद्यालयाचा *वर्धापन दिन*….नवा पेशवे वाडा दिन . सर्वप्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने पेठे विद्यालयाचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी या सर्वांना *मनःपूर्वक शुभेच्छा!
मित्रांनो, व्यक्तीच्या कार्याचे मूल्यमापन तपाच्या मापाने करतात तर संस्थेच्या/शाळेच्या कार्याचे मूल्यमापन शतकाच्या मापाने! विद्या यश: सुखकरी हे आपले ब्रीदवाक्य आपल्या पेठे विद्यालयाने सार्थ करून दाखविले आहे.
ख्रिश्चन मिशनरी सोसायटीच्या मदतीने आजच्या आपल्या पेठे विद्यालयाच्या जागेत १९०८ या वर्षी रेव्हरंड शिंदे यांनी सेंट जॉर्जेस हायस्कूलचीची स्थापना केली. नाशकात पूर्वी पेशव्यांचे दोन वाडे होते.एकात सरकारी फौजदार कचेरी तर दुसऱ्या वाड्यात आताचे पेठे हायस्कूल सुरू आहे.त्याकाळी सरकारी शाळांमध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी या शाळेमध्ये येत असत. मिशनरी शाळा असल्यामुळे गावातील लोकांचे शाळे बद्दलचे मत फारसे अनुकूल नव्हते.
या दरम्यान १९१८ मध्ये रुंगठा हायस्कूल ची स्थापना झाली. त्याचा परिणाम सेंट जॉर्जेस हायस्कूलच्या विद्यार्थी संख्येवर झाला. ही शाळा बंद करण्याचा निर्णय मिशन सोसायटीने घेतला. तेव्हा शाळेतील ध्येयवादी शिक्षक, कै. शं.दि. तथा नानासाहेब अभ्यंकर व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी स्वतः शाळा चालविण्याचा निर्धार केला. गावातील काही ही शिक्षणप्रेमी नागरिकांच्या मदतीने त्यांनी नाशिक एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. संस्था व शाळा स्थापनेत अनेक नामवंत व्यक्तींचे सहकार्य लाभले.
शाळा प्रगतीपथावर न्यायची झाल्यास आटोकाट प्रयत्न करणे गरजेचे होते. त्यादृष्टीने शाळेचे पदाधिकारी व *शिक्षकांनी* आघाडी घेतली. क्रीडा ,संगीत, विविध परीक्षा, बालवीर पथक यासारख्या क्षेत्रात शाळा पुढे येऊ लागली. १९२३ मध्ये तत्कालीन मुंबई प्रांताचे शिक्षण *मंत्री रँग्लर परांजपे* यांनी शाळेला भेट देऊन अडचणींना सामोरे जाणाऱ्या शाळेला आधार दिला.१९३८मध्ये शाळा आणि संस्थेचे पुढे एक अनपेक्षित संकट उभे राहिले. त्यात *सह्याद्री विमा कंपनीने कर्ज आणि पेठे बंधूंनी उदार* देणगी दिली. त्या माध्यमातून शहराच्या मध्यवर्ती भागात पेठे विद्यालयाची देखणी इमारत उभी राहिली. दरम्यानच्या काळात सरकारी हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नानासाहेब कर्वे यांची मदत झाली. श्री.वामन केशव तथा दादा खरे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह संस्थेत आले. अनेक नामवंत शिक्षक आणि शिक्षण प्रेमी संस्थेस लाभले. त्यानंतर पेठे विद्यालयाची आणि संस्थेची सर्व बाजूंनी भरभराट होऊ लागली.
सेंट जॉर्जेस हायस्कूल चे रूपांतर *दि. १५ जानेवारी १९४४* रोजी पेठे विद्यालय, नाशिक असे झाले. नामकरणाचा हा समारंभ बॅरिस्टर बाबासाहेब जयकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. हा शाळेच्या आणि संस्थेच्या इतिहासातील मोठा *भाग्ययोग* होता. सेंट जॉर्जेस हायस्कूल ते पेशवे वाडा बाबतची माहिती त्रोटक स्वरूपात *नाशिक व ख्रिस्त संदेश* या पुस्तकात वाचावयास मिळते. पेठे विद्यालयाच्या गेल्या ९९ वर्षातील कामगिरी निश्चितच *अभिमानास्पद* आहे. *आत्मविश्वास* वाढविणारी आहे. तसेच *प्रेरणा* देणारी देखील! शाळेचा आरंभीचा काळ *पायाभरणीचा* होता. प्रतिकूल परिस्थितीतून शाळेतील शिक्षकांनी शाळेला *उज्ज्वल* भविष्य मिळवून दिले. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने उत्तम, कार्य कुशल नेतृत्व आणि शाळेतील शिक्षकांचे योगदान हे *विकासाला* प्रेरक ठरले.
सह्याद्री विमा कंपनी, आदरणीय पेठे बंधू, उदार देणगीदार, यांच्याबरोबरच नामवंत शिक्षणतज्ञ शिक्षक, शिक्षणप्रेमी, काही समाज सेवी व्यक्ती यांचे पाठबळ शाळेला लाभले. सर्वांच्या मेहनतीचे फळ म्हणजे पेठे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सातासमुद्रापार शाळेचे नाव नेले! पेठे विद्यालयाच्या नामवंत *शिक्षकांप्रमाणे* अनेक *नामवंत विद्यार्थी* विविध क्षेत्रातील आपल्या कर्तुत्वाने पेठे विद्यालयाला मोठेपणा मिळवून देत आहेत.
मित्रांनो, काळाप्रमाणे शिक्षण क्षेत्रातही अनेकविध बदल झाले आहेत. आव्हाने वाढली आहेत. स्पर्धा निर्माण झाली आहे. इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. यासारख्या असंख्य समस्या आपल्यापुढे आहेत. परंतु आपण सर्व शिक्षकांनी हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे की, पेठे हायस्कूलने *संघर्ष* करून उज्वल यशाची परंपरा निर्माण केली आहे. पेठे हायस्कूलच्या पदाधिकारी आणि शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या *उल्लेखनीय* कामगिरीचा *इतिहास* आपण सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून ,बदलत्या परिस्थितीतही शाळेची यशोपताका फडकत ठेवली पाहिजे. *शाळेच्या उज्वल यशात माझेही योगदान,खारीचा वाटा असावा, अशी उर्मी आपल्या सर्वात निर्माण होवो!!*
पुनश्च *वर्धापन दिनाच्या* निमित्ताने आपणा सर्वांना *मनःपूर्वक शुभेच्छा* व *नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा* !!