– किरण डोळस, नाशिक
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागात प्रामुख्याने भात, नागली, वरई व आंबा यासारखी पिके घेतली जातात. मात्र विक्री व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना हमीभाव व योग्य परतावा मिळत नाही. या परिसरात शेती व्यवसायात शाश्वत संधी निर्माण करण्याच्या हेतूने पेठ तालुक्यात गावंधपाडा येथील प्रयोगशील शेतकरी यशवंत गावंडे हे विविध प्रयोग करीत असून त्यांच्याच पुढाकाराने शेतकरी गटाच्या माध्यमातून कामाची संधी निर्माण झाली. आणि या संघटित शेतीतून २०१९ मध्ये ‘वनराज शेतकरी उत्पादक कंपनी’ ची स्थापना झाली. या कंपनीत आज ३५० हून अधिक शेतकरी या कंपनीचे सदस्य आहेत. ज्यामुळे शेतकरी आता लाखभर रुपयांची कमाई करू लागले आहेत. परिणामी या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा सहभाग वाढीस लागल्यामुळे आदिवासी पाड्यावरील शेतकऱ्यांनी आता कात टाकली आहे.
कृषी विभागाकडून आयोजित केलेल्या प्रशिक्षणात येथील सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना सघन आंबा लागवड पाहवयास मिळाली. यापूर्वी बायफ संस्थेशी येथील शेतकरी जोडले गेले असल्याने ते आंबा लागवड करीत होते. परंतु प्रशिक्षणानंतर सघन पद्धतीच्या आंबा लागवडीला कंपनीच्या माध्यमातून चालना मिळाली. कृषी विभाग, आत्मा प्रकल्प, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आदींच्या सहकार्याने नव्या संधी ओळखून शेतीतील प्रयोगाचे विश्व विस्तारत गेले. यासाठी विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ, कृषी विज्ञान केंद्राचे रावसाहेब पाटील, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी शिलानाथ पवार, गट तंत्रज्ञान व्यवस्थापक सागर खैरनार यांचे सुरुवातीच्या काळात वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले असल्याचे यशवंत गावंडे सांगतात.
वनराजला ‘सह्याद्री फार्म्स’ची साथ
भात, नागली व आंबा ही प्रमुख उत्पादने अग्रस्थानी ठेऊन वनराज शेतकरी उत्पादक कंपनीने वाटचाल पुढे सुरु केली. पारंपरिक पिकांना पर्याय देत अर्थकारण उंचावणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. या वाटचालीत शेतकऱ्यांच्या कंपनीला सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा मोठा हातभार लागला. या भागातील प्रमुख पिक भात असल्याने सह्याद्रीने ‘इंद्रायणी’ वाणाच्या भात खरेदीच्या माध्यमातून काम हाती घेतले. सह्याद्रीने त्यांच्यासोबत करार करून खरेदी केल्याने चालू वर्षी ११० टन भात खरेदी झाली आहे. त्यामुळे आदिवासी भागातील शेतकरी उत्पादक कंपनीला सह्याद्रीसारख्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून मोठा आधार मिळत असून ही कंपनीसाठी मोठी संधी ठरत आहे.
‘वनराज’ची वाटचाल
◼ जिल्ह्यातील पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, दिंडोरी, कळवण तालुक्यात कंपनीचे कार्यक्षेत्र
◼ खरीप हंगामानंतर स्थलांतरीत होणारी काही कुटुंबे शेतकरी उत्पादक कंपनीमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहेत.
◼ कृषी पूरक उद्योगातून महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगारनिर्मिती होत आहे.
◼ उत्पादन व विपणन कौशल्य अवगत झाल्याने शेतकऱ्यांना व्यावसायिक संधी मिळाल्या आहेत.
◼ प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतमालाचे मूल्यवर्धन करण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील
कंपनीने यशस्वी केलेले शेती प्रयोग:
◼ १०० एकर क्षेत्रावर मधुमका लागवड करून हमी भावाने विक्री
◼ २० एकर क्षेत्रावर बेंगलोर मोगरा लागवड : ४० सभासदांचा सहभाग
◼ १०० महिला व पुरुषांना मशरुम उत्पादनाचे प्रशिक्षण देऊन उत्पादन सुरु
◼ १०० एकर क्षेत्रावर भात बीजोत्पादन कार्यक्रम
आगामी उद्देश:
◼ भात, नागली, वरई या धान्यावर प्रक्रिया करुन उत्पादीत मालाच्या विक्री व निर्यातीवर भर
◼ आंबा प्रक्रिया उत्पादनासाठी महिलांना सहभाग नोंदवून लघु प्रक्रिया उद्योगाची स्थापना
◼ सेंद्रिय शेती धान्य, भाजीपाला, फळांचे उत्पादन घेऊन निर्यातीस चालना
◼ मोगरा व मोह फुलांवर प्रक्रिया उत्पादन
Nashik Paint Trible Farmers Group Agriculture Experiment