विशेष प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेत २४ रुग्णांचा मृत्यू झाला. या रुग्णांचा मृत्यू ठेकेदाराच्या हरगर्जीपणामुळे झाल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. हा अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
दुर्घटनेच्या चौकशीसाठी विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ऑक्सिजन गळती झाल्याचे समितीच्या अहवालात म्हटले आहे. दुर्घटनेच्या चौकशीचा अहवाल १५ दिवसांच्या आत सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. परंतु मुदतीपर्वीच अहवाल सादर करण्यात आला आहे. राधाकृष्ण गमे यांच्या चौकशी समितीत वैद्यकीय अधिकारी, तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य, महापालिका अभियंता आणि ऑक्सिजन प्लांट उभारणीचे काम करणाऱ्या लोकांचा समावेश आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या अहवालानंतर आता ठेकेदारावर गुन्हा दाखल होणार की अन्य काही कारवाई होणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
कधी झाली दुर्घटना
महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात २१ एप्रिलला दुपारी साडेबाराच्या दरम्यान ऑक्सिजन गळतीमुळे एकच गोंधळ उडाला होता. रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असलेल्या १५० रुग्णांपैकी २४ जणांचा तडफडून मृत्यू झाला होता. दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाने गळती रोखण्याचे प्रयत्न केले. साधारण दीड तासानंतर ऑक्सिजनची गळती थांबविण्यात आली होती. या रुग्णालयात कोरोनाबाधितांवरही उपचार सुरू होते. ऑक्सिजनविना रुग्णांचा जीव टांगणीला लागला होता.