नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी पाच किलो कांदा बाबा अमरनाथ (बाबा बर्फानी) यांना प्रसाद म्हणून अर्पण केला. यावेळी त्यांनी देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या वतीने प्रार्थना केली की कांदा पिकाला योग्य भाव मिळू दे..कांदा आयात निर्यातीचे योग्य धोरण ठरविण्यास केंद्र व राज्य सरकारला सुबुध्दी दे…..
साठे हे पाच किलो कांदे घेऊन बाबा बर्फानीच्या पवित्र गुंफेत गेले. येथे समोर असलेल्या दानपेटीला स्पर्श करून पुजाऱ्यांनी हा प्रसाद त्यांना परत केले. त्यानंतर हे कांदे साठे यांनी तेथे यात्रेकरूंच्या संरक्षणासाठी असलेल्या भारतीय लष्करी जवानांसाठी एका जवानाकडे सुपूर्त केले.
पहेलगाम ते बाबा अमरनाथ गुहेपर्यंत पाऊस व बर्फ थंडी असा खडतर प्रवास करीत साठे यांनी पाच किलो कांदे घेउन गेले होते. सुरक्षारक्षकांनी साठे यांना गुफेत कांदे नेण्यास विरोध केला होता. परंतु साठे यांनी सांगितले की, इतर लोक त्यांच्या श्रद्धेप्रमाणे प्रसाद ठेवतात. त्यानुसार माझी श्रद्धा आहे की मी माझ्या शेतात पिकवलेले कांदे प्रसाद म्हणून आणले आहे. तेव्हा चेक करून त्यांनी परवानगी दिली. त्यांच्याबरोबर बाजीराव अभंग, दिलीप घायाळ, श्रीकांत मंडलिक, दिलीप निकम, पवन वाकचौरे, संतोष घायाळ, ज्ञानेश्वर देसले, गणेश जेऊघाले, इत्यादी शेतकरी उपस्थित होते.