नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई अनुदान आणि चार महिन्यांपूर्वी जाहीर झालेले कांदा अनुदान अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले नाही त्यामुळे शेतक-यांनी आमदारांना फोन करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.
ते म्हणाले की, आता कालपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या तालुक्यातील आमदारांना फोन करावेत आणि तत्काळ सरसकट सर्व अर्ज जमा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कांदा अनुदान व अतिवृष्टीचे पंचनामे झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याची मागणी संबंधित आमदारांनी विधीमंडळ अधिवेशनात करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी फोनवर करावी. जोपर्यंत याबाबत अधिवेशनात ठोस भूमिका घेतली जात नाही तोपर्यंत प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांचे आमदारांना इतक्या संख्येने फोन गेले पाहिजेत की आमदारांचे वैयक्तिक मोबाईल नंबर व त्यांच्या पीएंचे मोबाईल नंबर दर मिनिटाला खणखणले पाहिजेत.