ओझर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील दत्तनगर परिसरात अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. येथे गच्चीवर जाऊन झाडावरील पेरू तोडणे एका कुटुंबाला प्रचंड महागात पडले आहे. पेरु तोडतेवेळी वीजेच्या उच्चदाब वायरचा शॉक लागून मायलेकीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, जावई आणि दोन मुले थोडक्यात बचावली आहेत. या घटनेमुळे संपूर्ण ओझरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
घरावरच्या गच्चीतील पेरू तोडत असताना हातातील रॉड हायटेन्शन वायरला लागला. त्यामुळे मीना हनुमंत सोनवणे आणि आकांक्षा राहुल रणशूर या मायलेकींचा जागीच मृत्यू झाला. तर पती राहुल रणशूर व त्यांच्या दोन बालकांना शॉक मुळे लांब फेकल्याने ते बालंबाल बचावले. ही घटना आज रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
राहुल रणशूर यांनी गच्चीवरून आरडाओरड केल्याने कॉलनीतील लोकांनी धाव घेतली. पण गच्चीतील पाण्याची टाकी फुटल्याने पूर्ण बंगल्यात वीज प्रवाह उतरला होता. ओझर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पिंपळगाव येथे पाठवला. सायंकाळी उशिरा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास ओझरचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी हे करीत आहेत. येथे राहणारे हे कुटुंबिय भाडेकरू म्हणून राहत होते. त्यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.
Nashik Ojhar Electric Shock Mother Daughter Death