नाशिक (इंडिया दर्पण) वृत्तसेवा – संक्रांत होऊन ४५ दिवस झालेत तरी चायना आणि नायलॉन मांजाचा कहर सुरूच आहे. अनेक पक्षी अजूनही वृक्षांवर आणि इमारतींवर अडकून असलेल्या मांज्यामुळे जखमी होत आहेत. असाच एक प्रकार आता उघडकीस आला आहे. आनंदवल्ली परिसरातील गोदावरी नदी लगत असलेल्या वृक्षांवर घार जातीचा पक्षी नायलॉन मांजा मध्ये गुंतून जीवाची सुटका करण्याचा प्रयत्न तो करत होता. वन्यजीव संरक्षण संस्थेचे भावेश जाधव यांना ते निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ संस्थेचे अध्यक्ष जयेश पाटील यांना संपर्क साधत त्याबद्दल सविस्तर माहिती दिली. जयेश पाटील आणि प्रशांत कोलते यांनी त्वरित धाव घेत पक्ष्याची मांज्यातून सुखरूप सुटका केली. त्यानंतर सादर घारीची तपासणी करून तिला शेजारीच असलेल्या रिव्हर साईड नावाच्या इमारतीवरून पुन्हा तिच्या अधिवासात मुक्त करण्यात आले. यावेळी पाटील म्हणाले की, चायना मांजाच्या निर्मिती करणाऱ्या अवैध कारखान्यांचा शोध घेऊन त्यावर कठोर कार्यवाही केली गेली पाहिजे. एकीकडे डोंगर फोड, वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. शहरात मांज्याचे जाळे पसरलेले आहे. पक्षी सुरक्षित कुठे आहेत? त्यांच्या अधिवसला तीव्र धोका निर्माण होत आहे. एकेकाळी दंडकारण्य असणारे नाशिक आज कुठल्या दिशेला जातंय. आता नाशिककरांना एकत्र येऊन आपला वारसा जपवावा लागणार आहे.