नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने लढविलेली शक्कल अखेर नामी ठरली आहे. थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल बजाओचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. त्यामुळेच अवघ्या एकाच दिवसात महापालिकेला तब्बल ३५ लाख रुपयांची करवसुली झाली आहे. त्यामुळे या मोहिमेद्वारे महापालिकेची ३ कोटींपेक्षा अधिक करवसुली आतापर्यंत झाली आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशानुसार कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली १७ ऑक्टोबरपासून ढोल बजाओ मोहिम हाती घेण्यात आली. एक लाखांच्या पुढे असलेले थकबाकीदार यांच्या घरासमोर किंवा आस्थापनांसमोर ढोल वाजविण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. १ नोव्हेंबर रोजी एकूण ३५ लाख ४५ हजार ८९ रुपये रुपयांची कर वसुली झाली आहे. नाशिक रोड विभागात सर्वाधिक १५ लाख ४९ हजारांची वसुली झाली आहे. सहा विभाग मिळून एकूण ७२ ठिकाणी ढोल वाजविण्यात आले.
मालमत्ता कर थकबाकीदारांकडून मोहिमेच्या सुरुवातीच्या तीन दिवसांतच एकूण २ कोटी ७४ लाख ३० हजार ५७१ रुपयांची वसुली मनपाने केली. १ लाख किंवा त्यापेक्षा जास्त थकबाकी असलेले एकूण १२५८ थबबाकीदार आहेत. त्यांची नावे नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहेत. घरपट्टी आणि पाणीपट्टीची थकबाकी भरावी तसेच चालू वर्षीचा कर भरुन नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जे कर भरणार नाहीत. त्यांच्या घरासमोर, आस्थापनांसमोर ढोल पथक ढोल वाजवणार आहे. वसुलीचे उद्दीष्ट पूर्ण होईपर्यंत ही मोहिम सुरुच राहणार असल्याची माहिती कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांनी दिली आहे.
विभागनिहाय कर वसुली खालीलप्रमाणे
नाशिक पश्चिम – 0
नाशिक पूर्व – 03,25,000 रुपये
पंचवटी – 08,46,965 रुपये
नाशिक रोड- 15,49,126 रुपये
नवीन नाशिक- 07,67,800 रुपये
सातपूर – 56,198 रुपये
एकूण – 35 लाख 45 हजार 89 रुपये
ढोल वाजविण्यात आलेली मिळकत संख्या
नाशिक पश्चिम – 0
नाशिक पूर्व – 16
नविन नाशिक -8
पंचवटी – 15
नाशिक रोड – 29
सातपूर- 4
एकूण – 72
Nashik NMC Tax Recovery Dhol Bajao Campaign