नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापालिकेच्या शाळेतील एका क्लासरुमची सध्या सर्वत्र मोटी चर्चा होत आहे. स्मार्ट स्कूल अंतर्गत पायलट क्लासरुम साकारण्यात आली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना या क्लासरुमची अनोखी भेट मिळाली आहे. त्यामुळे विद्यार्थीही हरखून गेले आहेत.
नवीन शैक्षणिक वर्ष 2023-24 शाळा पूर्व तयारी, शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन व शैक्षणिक कामकाजाच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार महानगरपालिकेच्या शाळा आज दि. 15 जून रोजी सुरु झाल्या आहेत. शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या प्रत्येक शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहुन विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पहिलीसह इतर वर्गातील मुलांचे औक्षण करुन फुले आणि खाऊ देऊन आनंदाने स्वागत करण्यात आले. मनपा शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी ‘मिशन अॅडमिशन’ मोहिम राबविण्यात येत आहे. सर्व शाळांची पटसंख्या जास्तीत जास्त वाढविण्यासाठी प्रत्येक वर्गात किमान 50 विद्यार्थी असे उद्दिष्ट मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाला देण्यात आले आहे.
मनपाच्या प्राथमिक 88 आणि माध्यमिक 12 अशा एकूण 100 शाळा आहेत. सुमारे 29 हजार पटसंख्या आहे. ही मोहिम यशस्वीपणे राबवून पटसंख्या 50 हजारपर्यंत नेण्याचे उद्दीष्ट आहे. एकूण 896 शिक्षक असून प्राथमिकचे 838 आणि माध्यमिकचे 58 शिक्षक आजमितीस कार्यरत आहेत. दरम्यान, बहुतांशी शाळांमध्ये मोफत गणवेशाचे आणि पुस्तक वाटपाचे काम सुरु आहे. तसेच नजीकच्या काळात मनपा शाळेतील सर्व साधारण प्रवर्गातील विद्यार्थांनाही मनपामार्फत गणवेश पुरविण्यात येणार आहेत.
स्मार्ट स्कूलचा ‘स्मार्ट’ क्लासरुम
नाशिक महानगरपालिकेच्या ‘स्मार्ट स्कूल’ या महत्वाच्या प्रकल्पांतर्गत नाशिक स्मार्ट सिटी मार्फत 69 शाळांचे 656 वर्ग डिजिटलाईज होणार आहेत. येत्या ऑगस्ट अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. ‘स्मार्ट स्कूल’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे मनपाच्या शाळांना उर्जितावस्था प्राप्त करुन देत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान काठे गल्ली येथील मनपा शाळा क्र. 43 मध्ये आज दि. 15 जूनपासून आठ स्मार्ट पायलट क्लासरुम सुरु झाले आहेत. मुलांनी वर्गात बसून ई-क्लासचा आनंद लुटला. या प्रसंगी मनपाचे अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी, स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे, डाएट संस्थेचे वरीष्ठ अधिव्याख्याता शिवाजी औटी, विषय तज्ज्ञ प्रल्हाद हंकारे उपस्थित होते.
या क्लासरुममध्ये पारंपरीक फळ्यासोबतच स्मार्ट बोर्ड, नवीन बेंचेस, इंटरनेट कनेक्शन, डीजिटल अभ्यासक्रमाची शैक्षणिक सुविधा आहे. पूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले आहेत. क्लासचे नव्याने रंगकाम करण्यात आले आहे. याव्यतिरीक्त शाळेत 21 संगणकांचा एक कक्ष विकसीत करण्यात आला आहे. उर्वरीत 68 शाळांमध्ये याच धर्तीवर काम प्रगतीपथावर सुरु आहे.