नाशिक – शहरामध्ये मागील काही दिवसांपासून विविध रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. रुग्णालयामार्फत एक दोन तास आधी कळविण्यात येते की ऑक्सिजन संपला आहे तातडीने काहीतरी करा. अथवा आमचे रुग्ण इतरत्र शिफ्ट करायची परवानगी द्या. आणिबाणीच्या परिस्थितीमध्ये रूग्ण रुग्णाचे नातेवाईक यांची हेळसांड होते. म्हणून नाशिक महानगर पालिकेतर्फे आदेश काढण्यात आलेला आहे. त्यानुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रा करिता ऑक्सिजन हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात दूरध्वनी क्रमांक 0253-2220800 यावर संपर्क करावा, असे आवाहन आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे..
खाजगी रुग्णालय मधील ऑक्सिजनची मागणी त्यांच्या संबंधित ऑक्सिजन पुरवठा दाराकडे किमान 24 तास किंवा त्यांचे करारनामा प्रमाणे नोंदवावी. तद्नंतर 16 तासांमध्ये हा पुरवठा पुरवठादारांकडून न झाल्यास नाशिक महानगरपालिकेच्या ऑक्सिजन हेल्पलाइनला रुग्णालयांनी संपर्क साधावा.
हेल्पलाईन तर्फे ऑक्सिजन पुरवठा धारकास ऑक्सिजन पुरवठा करण्यास सांगितले जाईल तसेच याबाबत जिल्हा ऑक्सिजन हेल्पलाइन कक्षास माहिती दिली जाईल. पुरवठादाराकडे ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसल्यास अप्पर जिल्हाधिकारी यांचे सनियंत्रातील मेडिकल ऑक्सीजन नियंत्रण कक्षास अवगत केले जाईल.
यामध्ये सर्व विभागीय अधिकारी यांना याबाबत सर्व खाजगी रुग्णालयांना अवगत करणे व या रुग्णालयांची खाटा संख्या अद्ययावत करण्याचे कामकाज विभागीय स्तरावर करण्यात येणार आहे. तसेच सर्व खाजगी रुग्णालय व्यवस्थापकांनी त्यांचे रुग्णालयाचे ऑक्सिजन ऑडिट करून घेणे बाबत आदेशित करण्यात आलेले आहे. रूग्णालयामधील ऑक्सीजनचे असलेले लिकेजेस तसेच ऑक्सिजन यंत्रणांमधील विविध सामग्री यांची देखभाल-दुरुस्ती याबाबत प्रमाणपत्र अहवाल सर्व रुग्णालय व्यवस्थापकांनी मनपास सादर करणेबाबत आयुक्त कैलास जाधव यांनी आदेशित केले आहे