मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी राज्य सरकारने रमेश पवार यांची नियुक्ती केली आहे. सद्यस्थितीत पवार हे मुंबई महापालिकेत सुधार विभागाचे सहआयुक्त आहेत. पवार यांनी इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले आहे. तसेच, त्यांनी मुंबईतील व्हीजेटीआय संस्थेमधून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांना महापालिकेतील कामकाजाचा तब्बल ३० वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी महापालिकांमध्ये उपायुक्त, सह आयुक्त, सहाय्यक आयुक्त अशा विविध पदांवर काम केले आहे.
मुंबई महापालिकेच्या कामजाचा त्यांना उत्तम अनुभव आहे. मुंबई मनपामध्ये अजॉय मेहता आणि प्रवीण परदेशी हे आयुक्त असताना पवार यांच्याकडे आयुक्त कार्यालयाची जबाबदारी होती. त्यांनी ती उत्तमरित्या सांभाळली. तसेच, कोरोनाच्या संकटकाळात मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मुंबई महापालिकेचा कोरोना लढा यशस्वी होण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. मुंबई महानगरामध्ये विविध नव्या योजनांची संकल्पना, त्यांचे नियोजनात आणि अंमलबजावणी यात त्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. परिणामी, त्याचा अनुभव नाशिक महापालिकेमध्ये त्यांना उपयुक्त ठरणार आहे. मुंबई महापालिकेतील सहआयुक्त (सुधार) हे पद अतिशय महत्त्वाचे आहे. या विभागाअंतर्गत मालमत्ता, बाजार, अग्निशमन, गृहकर्ज, चाचणी व लेखापरीक्षा या महत्वाच्या विभागांचा समावेश होतो. याच पदावर ज्येष्ठ सनदी अधिकारी अजॉय मेहता, सिताराम कुंटे, आर. ए. राजीव, सतिश भिडे, श्रीमती राधा यांनी जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे पवार यांच्या प्रदीर्घ मनपा कामकाजाचा नाशिकच्या विकासात मोठा उपयोग होईल, अशी अपेक्षा राज्य सरकारला आहे. त्यामुळेच त्यांची नाशिक मनपा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले जाते.