नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापालिकेच्या मोरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा संदीप वाजे यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला आहे. विल्होळी परिसरात त्यांची कार जळालेल्या अवस्थेत आढळून आली आहे. त्यामुळे त्यांना जिवंत जाळण्यात आले की अन्य काही याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डॉ. सुवर्णा वाजे या महापालिकेच्या मोरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी होत्या. अत्यंत कर्तव्यदक्ष आणि हुशार अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांचे पती संदीप हे खासगी कंत्राटदार आहेत. मंगळवारी (२५ जानेवारी) सकाळी डॉ. वाजे या आरोग्य केंद्रात गेल्या. मात्र, रात्री उशीरापर्यंत त्या घरी परत आल्या नाही. त्यामुळे त्यांचे पती संदीप यांनी अंबड पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. डॉ. वाजे यांचा शोध घेण्यात आला. आणि बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास विल्होळी परिसरात एक कार जळालेल्या अवस्थेत आढळून आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जळालेल्या कारमध्ये एक मृतदेह पोलिसांना आढळून आला. चौकशी केली असता हा मृतदेह डॉ. सुवर्णा वाजे यांचा असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
दरम्यान, याप्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. डॉ. वाजे यांना कारमध्ये जिवंत जाळले की अन्य काही याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. याप्रकरणी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अधिक तपास सुरू आहे.