नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आगामी पावसाळ्याच्या तोंडावर नाशिक महापालिका आक्रमक झाली आहे. म्हसरुळ परिसरात नैसर्गिक नाला बुजविणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामुळे नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
म्हसरुळ शिवारातील वरवंडी रस्ता परिसरात गट नंबर १७१ व ७१ येथे नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण केल्याचे दिसून आले. नाल्यामध्ये ६०० मीटर व्यासाचे सिमेंटचे आरसीसी पाईप टाकण्यात आले. यामुळे हा नाला बंदिस्त करण्यात आला. तसेच, या कामासाठी मनपाची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही. हे काम तत्काळ बंद करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. सदर जागा ही नैसर्गिक नाल्याची आहे. याप्रकरणी बिल्डर अग्रवाल आणि तिवारी यांच्याविरुद्ध एमआरटीपी अॅक्ट अंतर्गत महापालिकेने पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. महापालिकेच्यावतीने बऱ्याच कालावधीनंतर अशा प्रकारे आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे त्याची सध्या शहरात चर्चा सुरू आहे.