नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अतिक्रमण हटाव कारवाई दरम्यान जेसीबीवर दगडफेक केल्याची घटना नाशिकमध्ये फुलेनगर परिसरात घडली. डावा कालवा येथील अनधिकृत झोपड्या महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटवल्यानंतर ही दगडफेक करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून पोलीस कर्मचारी तसेच दंगल नियंत्रण पथक यांच्या बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्यात आले. त्याअगोदरच रहिवाशांना झोपड्या हटविण्यासाठी महापालिकेकडून नोटीसा देण्यात आल्या होत्या. मात्र या नोटिसांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आज अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई सुरळीतपणे सुरू असताना काही नागरिकांनी गोंधळ घालून जेसीबीवर दगडफेक केली.
सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र जेसीबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जेसीबीचे नुकसान करणाऱ्या युवकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करूणा डहाळे यांनी दिली. तसेच यापुढे अशाप्रकारे कोणी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, तर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देखील देण्यात आला.
Nashik NMC Encroachment Drive Stone Pelting