नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी राज्य सरकारने रमेश पवार यांची नियुक्ती केली आहे. पवार हे सध्या मुंबई महापालिकेत सहआयुक्त म्हणून कार्यरत आहेत. तर, पवार यांनी तातडीने नाशिक मनपा आय़ुक्त पदाचा पदभार स्विकारावा, असे आदेश सरकारने काढले आहेत.
नाशिक शहरात म्हाडाच्या घरांचा तब्बल ७०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा प्रकार विधिमंडळात उपस्थित झाला. यासंदर्भात नाशिक महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारला योग्य माहिती दिली नाही. त्यामुळे ही बाब अतिशय गंभीर असल्याचे सांगत नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव यांची तातडीने बदली करण्याचे आदेश विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले. त्यानुसार आज राज्य सरकारने आदेश काढत रमेश पवार यांनी नाशिक मनपा आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. तर, जाधव यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आलेले नाही. त्यामुळे ते सध्या वेटिंगवर असल्याचे सांगितले जाते.