नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगर पालिकेच्या इतिहासात एकहाती सत्ता कोणालाही मिळाली नव्हती ती मागच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळाली. पण या पाच वर्षात नाशिकच्या पदरी निराशाच पडली. एकहाती सत्ता असल्याने त्या जोरावर महासभा रेटून नेल्या. नाशिकच्या विकासासाठी एकही प्रोजेक्ट पूर्ण केला नाही, असा गंभीर आरोप नाशिक महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला.
नाशिक मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया दर्पण फेसबुक लाइव्हमध्ये ते बोलत होते. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. आगामी निवडणुकीच्या तयारी विषयी बोलताना ते म्हणाले की, शिवसेना हा चळवळीतून निर्माण झालेला पक्ष आहे. त्यामुळे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही कामे करत नाही. प्रभागरचनेतील बदलाविषयी त्यांनी सांगितले की, जो काम करतो त्याला प्रभागरचना त्यातील बदल याचा फरक पडत नाही. मी याआधी चार वेळा निवडून आलो आहे आणि प्रत्येक वेळी प्रभागरचनेत बदल झाले होते. प्रभागरचना कितीही बदलली तरी तुमचं काम बोलतं असे मत त्यांनी व्यक्त केले.
शहरातील विकास कामांविषयी त्यांनी सांगितले की, शहरात रस्ते झाले, मोठ्या इमारती बांधल्या पण नुसता हा विकास नाही. शहरासाठी इन्फ्रास्ट्रक्चर महत्त्वाचे आहेच पण शहरातील व्यक्तीचा सर्वांगीण, आर्थिक, शैक्षणिक विकास सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आपण विकासाची व्याख्या एकदा ठरवून घेणं गरजेचं आहे. मागच्या पाच वर्षात एकही नवीन इंडस्ट्री नाशिकमध्ये आली नाही. रोजगार उपलब्ध झाले नाहीत. निवडणूक आल्यावर आयटी पार्कचा मुद्दा पुढे आला. नाशिकमध्ये किती नवीन आयटी इंडस्ट्री यायला उत्सुक आहेत, त्यांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत याचा लेखाजोखा असणं आवश्यक आहे.पुढे ते म्हणाले की, शहराच्या विकासाशी संबंधित बांधकाम नियमावली ठाकरे सरकारच्या काळात मुक्त झाली. नाशिक मनपातील अनुकंपा तत्वाचा प्रश्न तेरा वर्षे प्रलंबित होता तो प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका भेटीत सोडवला. नाशिक मनपातील १४७ कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली.
आगामी निवडणूकिविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, शिवसेना हा आदेशानुसार चालणारा पक्ष आहे. येणाऱ्या निवडणुकीत स्वतंत्र लढणार की महाविकास आघाडी मिळून लढणार हे पक्षप्रमुख ठरवतील. पण आमची तयारी पूर्ण जागांवर लढण्याची आहे. पक्षातील अंतर्गत नाराजीनाट्याविषयी ते बोलले की जागा मर्यादित असतात आणि इच्छुक अनेक असतात. पण प्रत्येक वेळी सगळ्यांना जागा देणं शक्य नसतं. आपल्याला महानगरपालिकेत भगवा फडकवायचा आहे त्यामुळे अंतर्गत रस्सीखेच ठेवू नका, असे ते म्हणाले. नाशिककर सगळे सुज्ञ आहेत आणि ते आमच्यावर नक्कीच विश्वास दाखवतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
बघा, संपूर्ण मुलाखतीचा व्हिडिओ
व्हिडिओ सहकार्य – सिद्धी दाभाडे