इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी आता प्रशासनाला शिस्त लावण्याच्या दृष्टीने अचानक विभागीय कार्यालयांना भेटी देण्यास सुरवात केली असून आज त्यांनी पंचवटी विभागीय कार्यालयाला भेट दिली. सामान्य नागरीकांच्या समस्या या विभागीय कार्यालय स्तरावरच सोडवल्या गेल्या पाहीजे यावर आयुक्तांनी प्रारंभीपासून भर दिलेला असून त्याच अनुषंगाने पंचवटी विभागीय कार्यालयाच्या विविध विभागांच्या कामकाजाची पहाणी केली. आपल्या या भेटी दरम्यान बाहेर कार्यालयीन कामकाजानिमित्त असलेल्या कर्मचाऱ्यांची सखोल माहिती घेतली. सर्वच विभागाचे हालचाल नोंद वही तपासली त्यातील नोंदी योग्य आहे का याची खात्री करण्यात आली.बेशिस्त कर्मचारी यांनी नियमांचे पालन करावे अन्यथा कारवाईला सामोरे जावं लागेल असे निर्देश आयुक्त खत्री यांनी दिले.
विभागीय कार्यालयातील कामकाजासबंधीत व तेथील अडचणींबाबत देखील माहिती विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांचेकडून जाणून घेतली. विभागातील अभिलेखे वर्गीकरणाबाबत कर्मचाऱ्यांना विचारणा करुन यावर नियोजन अद्यापही केले नसल्याबाबत नाराजी व्यक्त करुन यावर त्वरीत कार्यवाहीच्या सूचना देखील दिल्या. विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयीन कामकाज व शिस्तीला प्राधान्य देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. नागरीकांच्या तक्रारी मुख्यालयापर्यंत येणार नाही याची दक्षता घेणेबाबत त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना ताकीद दिली. तसेच विभागीय कार्यालयातील कामकाजाचा वेळोवेळी आढावा घेणार असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. या भेटीच्या वेळी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र व इतर अधिकारी उपस्थीत होते.या वेळी विद्युत विभातील फिल्डवर गेलेल्या कर्मचारी यांची माहिती पदनाम व नावासह आयुक्त खत्री यांनी संपूर्ण माहिती घेतली.
आयुक्तांच्या या भेटीमुळे बेशीस्त कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण तर प्रामाणिक कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. या भेटीमुळे मनपाच्या इतर विभागीय कार्यालीयातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील कार्यालयीन वेळेत कामावर उपस्थीत रहाण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून आले. अश्या प्रकारच्या भेटीमुळे सामान्य नागरीकांमध्येही प्रशासनात सकारात्मक बदल आयुक्त करीत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.येत्या काहि दिवसात अन्य विभागात आयुक्त खत्री अचानक भेटी देणार असून तेथील कामकाजाची माहिती घेणार आहे व कर्मचारी उपस्थिती बाबत व कार्यालयीन अभीलेख्यांची तपासणी करणार आहे.