येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी अजित पवारांच्या नेतृत्वात सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. भुजबळ मंत्री होताच येवला मतदारसंघातील रोखण्यात आलेला निधी आता पुन्हा सुरू झाला आहे. येवल्यातील तात्या टोपे स्मारकासाठी निधी मंजूर झाल्यानंतर आता आणखी विकास कामांसाठी ४ कोटींचा निधी मिळाला आहेय निफाड तालुक्यातील १६ गावांमध्ये नवीन तलाठी कार्यालय व निवासस्थानासाठी ४ कोटी ८० लक्ष रुपयांच्या निधीस शासनाची मंजुरी मिळाली आहे. या विकास कामांमुळे सुसज्ज कार्यालय उभे राहणार असून नागरिकांना महसुली सुविधा उपलब्ध होण्यास अधिक मदत होणार आहे.
येवला मतदासंघांत निफाड तालुक्यातील १६ गावांमध्ये नवीन तलाठी कार्यालय व निवासस्थाने बांधण्यासाठी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार या नूतन तलाठी, मंडल कार्यालय व निवासस्थाने बांधण्यासाठी शासनाकडून ४ कोटी ८० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामांमुळे सुसज्ज कार्यालय उभे राहणार असून नागरिकांना महसुली सुविधा उपलब्ध होण्यास अधिक मदत होणार आहे.
यामध्ये निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव,विंचूर, विष्णूनगर, गोंदेगाव, धारणगाव वीर, डोंगरगाव, लासलगाव, टाकली, विंचूर, निमगाव वाकडा, पिंपळगाव नजिक, वनसगाव, देवगाव, वाकद, कानळद, खेडलेझुंगे, भरवस या एकूण सोळा गावांचा समावेश असून या गावांमध्ये तलाठी कार्यालय व निवासस्थाने बांधण्यात येणार आहे.