नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विवाहानंतर तब्बल बारा वर्ष वेगळे राहणा-या पतीला न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. घटस्फोट देवून त्याची आपल्या पत्नीपासून सुटका केली आहे.
सय्यद पिंप्री येथील रमेश याचा सन २००८ मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर त्यास पुत्ररत्न प्राप्त झाले. लग्नानंतर अवघ्या दोनच वर्षांनी म्हणजेच सप्टेंबर २०१० मध्ये पत्नी सविता हिने पती रमेशचा त्याग केला. रमेशने पत्नी सविता हिस नांदविण्याची तयारी दर्शवली. यासाठीच त्याने २०१२ मध्ये कोर्टात धाव घेतली. त्याची दखल घेत न्यायालयाने पती रमेशच्या बाजूने निकाल दिला.
न्यायालयाच्या निकालानंतरही पत्नी सविता ही पती रमेश सोबत नांदावयास आली नाही. अखेर पती रमेशने निफाड येथील दिवाणी न्यायालयात घटस्फोटासाठी २०१७ मध्ये अर्ज केला. न्यायाधीश आरती सराफ यांच्या न्यायालयात अॅड. धर्मेंद्र चव्हाण यांनी पतीची बाजू मांडली. पत्नीने बारा वर्ष पतीचा त्याग केल्याने पतीस न्यायालयाने घटस्फोट मिळवून दिला.