निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील बीएसएनएलच्या मनोऱ्यावर चढून स्टंटबाजी करणाऱ्या युवकामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली. बघ्यांची एकच गर्दी या परिसरात झाल्यामुळे नाशिक औरंगाबाद महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झालेली होती. तब्बल तीन तास पर्यंत अथक प्रयत्न करून सदर युवकाला जमिनीवर उतरवण्यात आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश मिळाले .
याबाबत माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी पाच वाजेचे सुमारास निफाड येथील देविदास विष्णू भगरे (२३) हा आदिवासी युवक दारूच्या नशेत स्टंटबाजी करीत निफाडच्या जळगाव फाटा येथील टेलिफोन एक्सचेंजच्या सुमारे साडेतीनशे फूट उंचीच्या मनोऱ्यावर चढून गेला. तो मनोऱ्यावर चढत असताना आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात ही गोष्ट येतात सर्वत्र एकच गोंधळ उडाला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मात्र पोलीस घटनास्थळी येईपर्यंत सदर युवक मनोऱ्याच्या शिखरापर्यंत जाऊन पोहोचलेला होता. त्याला तेथून उतरवणे हे पोलीस प्रशासनासाठी अवघड होऊन गेले होते.
त्यामुळे पिंपळगाव बसवंत येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाला बचाव कार्यासाठी पाचारण करण्यात आले. या पथकातील अभिजीत काशीद वसंत काळे आणि रवींद्र बैरागी हे तिघेही जवान भगरे यांच्या मित्राला सोबत घेऊन मनोऱ्याच्या शिखरावर पोहोचण्यात यशस्वी झाले. त्या ठिकाणी देविदास भगरे यांची समजूत काढून त्याला सुरक्षितपणे जमिनीवर उतरवण्यात या पथकाला यश मिळाले. यापूर्वी देखील जवळच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या एका तरुणाने बायको माहेरी गेल्याचा राग येऊन अशाच प्रकारे या मनोऱ्यावर चढाई केलेली होती.