नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) निफाड तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ग्रामसेवकासह दोन खासगी एजंट यांना लाच गेताना रंगेहाथ पकडले आहे. नैताळेच्या यात्रेत रहाट पाळणा आणि मनोरंजनाचे दुकान लावण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. याप्रकरणी एसीबीने तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, नैताळे येथे मतोबाची यात्रा भरणार आहे. या यात्रेत विविध प्रकारची दुकाने लागतात. तसेच, मनोरंजनाची काही दुकाने आणि रहाट पाळणेही असतात. याच यात्रेच रहाट पाळणा आणि मनोरंजनाचे दुकान लावण्यासाठी ग्रामसेवकाकडून परवानगी घ्यावी लागते. या परवानगीसाठी व्यावसायिकांनी अर्ज केला होता. मात्र, नैताळेचा लाचखोर ग्रामसेवक राजेंद्र मुरलीधर दहिफळे (वय ४६ वर्षे) याने तब्बल ३१ हजार रुपयांची लाच मागितली. अखेर तडजोडी अंती ही रक्कम ७ हजार रुपये निश्चित करण्यात आली. त्यानंतर यासंदर्भात एसीबीकडे तक्रार करण्यात आली. एसीबीने याची दखल घेत सापळा रचला. दहिफळे याने संबंधित व्यावसायिकाला सांगितले की, लाचेचे ७ हजार रुपये हे जगन्नाथ मगन पाठक, (वय ३८ वर्षे, व्यवसाय पेंटिंग, नैताळे) आणि सागर भारत आहेर (वय २५ वर्ष, व्यवसाय मजुरी, नैताळे) यांच्याकडे देण्यास सांगितले. आणि ही ७ हजार रुपयांची लाच घेताना पाठक आणि आहेर हे दोन्ही रंगेहाथ पकडले गेले. आता या प्रकरणी एसीबीने सर्व पुरावे गोळा केले आहेत.
पोलिस निरीक्षक साधना भोये आणि पोलिस निरीक्षक अनिल बागुल यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला. दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा असून या संदर्भात १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.
Nashik Niphad ACB Raid Trap Bribe Corruption