नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी (NIC) राजेश साळवे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज सकाळी निधन झाले. त्यांचे वय ५६ वर्षे होते. आज सकाळीच ते ऑफिसला जाण्यासाठी तयार झाले होते. मात्र, अॅसिडीटीचा त्रास होत असल्याचे त्यांना वाटले. त्यामुळे काही वेळ आराम करुन मग ऑफिसला जाण्याचे त्यांनी निश्चित केले. मात्र, याचदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नाशिक स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे. अतिशय मनमिळावू, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. केंद्र सरकारचे कर्मचारी असलेले साळवे हे जिल्ह्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे कार्य बघत होते. कोरोनाच्या काळात सर्व सरकारी कामे ऑनलाईन पद्धतीने होत होती. त्यामुळे सहाजिकच जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने त्यांनी ती जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली. त्यांचे अचानक निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तसेच, विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे.
Nashik NIC Officer Rajesh Salve Death