नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भररस्त्यात दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना गंगापूररोडवरील भोसला स्कुलच्या प्रवेशद्वारावर घडली. या घटनेत दगडफेक करीत एकास चाकू खूपसण्याचा प्रयत्न झाला. पोलीसानी वेळीच धाव घेतल्याने चार जणांना बेड्या ठोकण्यात यश आले असून त्यांचे साथीदार अद्याप फरार आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवन संजय आरोळे (२१ रा.मौनगिरी अपा.त्रिमुर्तीनगर,हिरावाडी), तुषार विठ्ठल कापसे (२० रा.गोवर्धन ता.जि.नाशिक),विजय भाऊसाहेब गांगुर्डे (१९ रा.गल्ली नं.४,पाण्याच्या टाकी जवळ,पंचवटी) व काझीम सलाउद्दीन अन्सारी (१९ रा.तुळजा भवानी मंदिरामागे, स्वामी विवेकानंद नगर,सातपूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून तुषार राकेश गायकवाड,पियूष प्रकाश माळी व सव्दव राजाराम पगारे आदी त्यांचे साथीदार अद्याप फरार आहेत.
याप्रकरणी अंमलदार सागर बागुल यांनी फिर्याद दिली आहे. गंगापूररोडवरील भोसला स्कूलच्या प्रवेशद्वार भागात गुरूवारी(दि.२९) सायंकाळच्या सुमारास दोन गट भिडले होते. अज्ञात कारणातून झालेल्या या राड्यात संशयित एकमेकांमध्ये भिडले होते. यावेळी संशयित तुषार कापसे हा काझीम अन्सारी याच्यावर चाकू हल्ला करतांना मिळून आला तर अन्य संशयित दगडफेक करतांना आढळून आले. पोलीसांनी वेळीच धाव घेतल्याने अनर्थ टळला असून अधिक तपास उपनिरीक्षक लांडे करीत आहेत.