नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मालवणमध्ये तीन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. त्या निषेधार्थ संताप व्यक्त करत राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन करून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी दिंडोरी लोकसभा अध्यक्ष रविंद्र पगार, नाशिक लोकसभा अध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, प्रदेश पदाधिकारी अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगळे, संजय खैरनार, योगिता आहेर उपस्थित होते.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला हे अत्यंत वेदनादायी हृदयद्रावक आहे. अवघ्या आठ महिन्यांत हा पुतळा कोसळला, ही धक्कादायक बाब आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचे यावरून समोर येते. सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर युगपुरूष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा आणि दैदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे भव्यदिव्य स्मारक आणि शक्तिशाली पुतळा पुन्हा उभारावा तसेच भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्यासाठी या प्रकरणात जे जे कोणी दोषी असतील त्यांच्याविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सीबीएस येथे असलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बसून मूक आंदोलन करून करण्यात आली.
यावेळी रंजन ठाकरे म्हणाले की, मागील आठ महिन्यापुर्वी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता. पण तीन दिवसांपूर्वी पुतळा कोसळण्याची घटना घडली आहे. यामुळे माझ्यासह देशभरातील सर्व शिवशक्तच्या मनात तीव्र नाराजी आणि दुस-या बाजूला संताप व्यक्त होत आहे. साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले किल्ले आज देखील सुस्थिती आहे. पण आठ महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारलेला पुतळा कोसळतो. यावरून त्या कामाबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहे. राज्य सरकारने यापुढील काळात पुतळा उभारताना विशेष काळजी घ्यावी, अशी मागणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी योगेश निसाळ, चेतन कासव, डॉ. योगेश गोसावी, प्रमोद सोनवणे, अमोल नाईक, नितीन चंद्रमोरे, अजय खांडबहाळे, शंकर मोकळ, राजाराम धनवटे, जीवन रायते, आसिफ मुळाणी, सागर लामखेडे, साहेबराव पेखळे, योगेश दिवे, नाना पवार, बाळासाहेब काठे, संतोष भुजबळ, अपर्णा खोत, निर्मला सावंत, माधुरी एखंडे, अपेक्षा अहिरे, नलिनी वनजे, रोहीणी रोकडे, सोपान कडलग, सचिन चांदवडे, प्रशांत कोल्हे, गोकुळ पाटील, भावेश निर्वाण, सुरज चव्हाण, हरिष महाजन, वजाहत शेख, अक्षय धनवटे, विलास वाघ, हेमंत कांबळे, शुभम गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








