नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोविंदनगर, सद्गुरूनगर येथील इंडिगो पार्कजवळील जॉगिंग ट्रॅक प्रायोजक अथवा महापालिकेकडून विकसित करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक महापालिका स्थायी समिती सभा क्रमांक २८ मध्ये विषय व ठराव क्रमांक १००८ हा २८ फेब्रुवारी २०२२ रोजी मंजूर करण्यात आला. श्रीजी ग्रुपतर्फे श्री. अंजनभाई पटेल, नाशिक यांचेकडून इंडिगो पार्कजवळील जॉगिंग ट्रॅक सुशोभिकरण करणे व देखभाल करणेस या ठरावान्वये मंजुरी देण्यात आली. सतरा महिने उलटूनही याबाबत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. संबंधित प्रायोजकाने महापालिकेला अद्याप याबाबतचा प्रस्तावही सादर केलेला नाही. त्याबाबत कार्यवाही करून संबंधितांकडून हा जॉगिंग ट्रॅक विकसित करण्याचे काम सुरू करावे, ते शक्य नसल्यास महापालिकेच्या खर्चातून हा जॉगिंग ट्रॅक विकसित करावा. यासंदर्भात यापूर्वी २४ एप्रिल २०२३ रोजी निवेदन देण्यात आले होते, त्याची दखल घेण्यात आली नाही. ४ जुलै २०२३ रोजी पुन्हा निवेदन देण्यात आले. त्वरित निर्णय घेवून काम सुरू करावे, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगीता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, विनोद पोळ, डॉ. शशीकांत मोरे, निलेश ठाकूर, विठ्ठलराव देवरे, भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, अशोक देवरे, दिलीप निकम, बापूराव पाटील, भारती देशमुख, वंदना पाटील, रूपाली मुसळे, दीपक दुट्टे, राहुल काळे, पुरुषोत्तम शिरोडे, तेजस अमृतकर, हरिष काळे, प्रथमेश पाटील आदींसह रहिवाशांनी दिला आहे. या निवेदनाची प्रत महापालिका बांधकाम विभागाचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांना देण्यात आली आहे.
अतिक्रमण नको
यापूर्वी एका बांधकाम व्यावसायिकाने अनियमित बांधकाम करून जॉगिंग ट्रॅकवर म्हणजेच महापालिकेच्या ताब्यात असलेल्या पाटबंधारे खात्याच्या जागेवर अतिक्रमण करून इमारतीसाठी प्रवेशद्वार जॉगिंग ट्रॅकवरून केले आहे. आता वरील प्रायोजकाचे मोठे बांधकाम या जॉगिंग ट्रॅकलगत सुरू आहे. त्याचे अतिक्रमण होवू नये. जॉगिंग ट्रॅककडून बांधकाम साईटला प्रवेश देण्यात येवू नये. तसे झाल्यास जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.